
टेलिव्हिजनवरील एका प्रसिद्ध अभिनेत्यावर फसवणूक आणि विवाहित असतानाही दुसरीसोबत वन नाईट स्टँड करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. अखेर या अभिनेत्याला पत्नीने घटस्फोट दिला आहे. यावर्षी रंगपंचमीला हा अभिनेता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसला होता.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आमिर अली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री संजीदा शेखशी त्याने लग्न केलं होतं. या दोघांची पहिली भेट 'क्या दिल में है' या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2012 मध्ये आमिर आणि संजीदाने लग्न केलं होतं.

2019 मध्ये आमिर आणि संजीदा सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा बनले. परंतु त्याच्या वर्षभरातच त्यांच्या नात्यात फूट पडली. 2021 मध्ये हो दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. घटस्फोटानंतर आमिर आणि संजीदाबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींनी संजीदाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता, असं म्हटलं जातं. परंतु ती विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम होती. संजीदाचं नाव अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतही जोडलं गेलंय.

'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत आमिर अलीने याची कबुली दिली होती की तो सुरुवातीच्या काळात खूप उद्धटपणे वागत होता. आमिरने एक-दोनदा नाही तर अनेकदा संजीदाची फसवणूक केल्याच्याही चर्चा होत्या.

आमिरच्या स्वभावाबद्दल कळूनही संजीदाने लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला होता, असं म्हटलं गेलं. परंतु जेव्हा तिला वन-नाईट स्टँडबद्दल समजलं, तेव्हा तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. या चर्चांवर आमिर किंवा संजीदाने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.