
आंतरधार्मिक सलोखा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी UAE सतत प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून UAE च्या सामुदायिक विकास विभागाचे अध्यक्ष डॉ. मुगीर खामिस अल खैली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह अबुधाबी येथील प्रतिष्ठित BAPS हिंदू मंदिराला भेट दिली.

स्वामी ब्रह्मविहारिदास यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. स्वामींना शिष्टमंडळाला मंदिराचा परिसर दाखवला आणि प्रेम, शांती आणि मैत्रीपूर्ण संबंधाच्या दृष्टिकोनाबद्दल माहिती दिली. ही भेट विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ बनले.

या भेटीवेळी स्वामी ब्रह्मविहारिदास यांनी युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या पाठिंब्याबद्दल आणि दूरदर्शी धोरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मंदिराचा विकास आणि विविध समुदायांमध्ये परस्पर आदर वाढवण्याची इच्छा असल्याचे शिष्ट मंडळाच्या लक्षात आणून दिले.

डॉ. अल खैली आणि त्यांच्या शिष्टमंडळाने हे मंदिर एकतेचे प्रतीक आहे असं म्हणत कौतुक केले आणि मंदिराच्या विविध धर्मातील लोकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

या शिष्टमंडळाने सामुदायिक एकता वाढवण्यासाठी आणि यूएईच्या सर्वसमावेशकतेच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणाऱ्या मंदिराच्या सकारात्मक योगदानाची दखल घेतली. त्यामुळे ही भेट खास ठरली.