
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने जल्लोष मेळावा आयोजित करण्यात आला.

मुंबईतील वरळी डोममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 18 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र आले.

या दोघांनी मंचावर एकत्र एण्ट्री केली. सर्वांचं लक्ष ठाकरे बंधुंवरच होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे इतर अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणीवसांनी केलं, अशी टिप्पणी राज ठाकरेंनी यावेळी मंचावर केली.

या विजयी मेळाव्यानिमित्त फक्त उद्धव आणि राज ठाकरेच एकत्र आले नाहीत, तर दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्र आले. मेळाव्याच्या शेवटी ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटोसेशनसुद्धा केलं.

यावेळी मंचावर उद्धव आणि राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आदित्य आणि अमित ठाकरेसुद्धा उपस्थित होते. आदित्य आणि अमित यांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

मंचावर फोटोसेशनदरम्यान उद्धव ठाकरेंच्या बाजूला अमित ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बाजूला आदित्य ठाकरे उभे राहिले. काकांच्या बाजूला दोन्ही पुतणे.. असं हे चित्र महाराष्ट्राने याआधी कधीच पाहिलं नसेल

अमित आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिले. कार्यक्रम संपल्यानंतर मंचावर दोन्ही ठाकरे कुटुंबीयांना एकत्र पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.

विजयी मेळाव्यात सर्वांत आधी राज ठाकरे यांचं भाषण झालं. सन्माननीय उद्धव ठाकरे.. असा उल्लेख करत त्यांनी भाषणाची सुरुवात केली होती. त्यावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला होता.