
सध्या राज्यात विविध गंभीर आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलं आहे. त्यातच आता एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

उल्हासनगरमध्ये चक्क गटाराच्या पाण्यात बुडवून पालेभाज्या धुतल्या जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी या भाजीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील खेमाणी परिसरात भाजी मार्केट आहे. या मार्केटमधल्या पोस्ट ऑफिससमोर एक उघडं गटार आहे.

या गटाराच्या पाण्यात इथले भाजी विक्रेते भाज्या बुडवून धुतात. इतकंच नव्हे, तर बादलीने या गटाराचं पाणी काढून ते भाज्यांवर मारतात आणि त्यानंतर या भाज्यांची विक्री केली जाते.

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.

एकीकडे तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

मात्र त्या भाज्या जर अशा गटाराच्या पाण्यात बुडवलेल्या असतील, तर यामुळे मात्र आरोग्याचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होऊ शकते.

यामुळे अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जातं आहे.