
कोल्हापूर उपनगरासह करवीर तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. वळवाच्या आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी आठवडा बाजारात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले.

करवीर तालुक्यातील चाफोडी गावात आठवडी बाजारातील शेतकऱ्यांचा साहित्य अक्षरशा वाहून गेले. साहित्य वाचवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांची देखील कसरत सुरू होती. कोल्हापूर जवळील पाचगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. सुमारे 15 ते 20 मिनिटं जोरदार पाऊस बरसला.

साताऱ्यातील पाटणमध्ये अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी रविवारी सकाळपासून रिमझिम पाऊस होता. या पावसामुळे कलिंगड, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पावसामुळे नुकसान झाले.

विदर्भात मंगळवारपासून (२ एप्रिल) काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्याने तापमान वाढणार आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमान ४२ अंश सेल्सियसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.

रविवारी सोलापुरात राज्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, बीड, अकोला, चंद्रपूरमध्येही पारा चाळिशीपार गेला होता. राज्याच्या बहुतेक भागांत कमाल तापमानात घट झाली असली तरीही किमान तापमान २५ अंश सेल्सिअवर कायम आहे.