
घरातील दरवाजे आणि खिडक्या केवळ घराची शोभा वाढवत नाहीत, तर त्या घरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या ऊर्जेचे प्रवेशद्वार म्हणून काम करतात. म्हणूनच वास्तुशास्त्रात त्यांच्या योग्य स्थितीला खूप महत्त्व असते.

वास्तुशास्त्रानुसार, खिडक्या योग्य दिशेने आणि योग्य संख्येत असणे फार गरजेचे आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. पण ही संख्या नेमकी किती असावी याबद्दल आपण जाणून घेऊया.

घरामध्ये खिडक्यांची संख्या नेहमी सम असावी. घरात २, ४, ६, ८ या प्रमाणात खिडक्या असाव्या. वास्तुशास्त्रानुसार खिडक्या कधीही १, ३, ५ या विषम संख्येत असू नये. ते अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

पूर्व दिशा सूर्योदयाची दिशा मानली जाते. म्हणून या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या असाव्यात. पूर्वेकडील खिडक्यांमधून येणारा सकाळचा सूर्यप्रकाश घरात आरोग्य, आनंद आणि भरभराट आणतो.

उत्तर दिशा धन-संपत्तीचे देवता कुबेर यांची मानली जाते. या दिशेच्या खिडक्या घरात पैसा आणि समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करतात. म्हणून, घरात उत्तरेकडील खिडक्या असणे खूप शुभ आहे. पश्चिम दिशेच्या खिडक्या देखील शुभ मानल्या जातात. या दिशेने संध्याकाळचा मंद सूर्यप्रकाश घरात येतो, जो सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेला खिडक्या ठेवणे टाळावे. ही दिशा यमराजाची मानली जाते. या दिशेच्या खिडक्या घरात रोगराई, दुःख आणि नकारात्मक ऊर्जा आणू शकतात. जर तुमच्या घरात या दिशेने खिडकी असेल तर ती शक्यतो बंद ठेवा किंवा जड पडद्यांनी झाकून ठेवा.

घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला समान आकाराच्या खिडक्या असणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा संतुलित राहते. ती एका दिशेने बाहेर पडत नाही. मुख्य दरवाजाच्या अगदी समोर खिडकी नसावी. कारण यामुळे घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा लगेच खिडकीतून बाहेर निघून जाते असे मानले जाते.

दरवाजे आणि खिडक्या अशा ठिकाणी असाव्यात. जिथे घरात पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि हवा येईल. यामुळे घराचे वातावरण नेहमी ताजे आणि सकारात्मक राहते.

दरवाजे उघडताना किंवा बंद करताना कर्कश आवाज येऊ नये. असे आवाज घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. दरवाजे नेहमी शांतपणे उघडले पाहिजेत. दरवाजे आणि खिडक्या नेहमी स्वच्छ ठेवा. त्यांच्या काचा स्वच्छ आणि चमकदार असाव्यात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)