
दैनंदिन जीवनात घाईगडबडीत आपल्या हातातून वस्तू निसटून पडणे ही एक सामान्य घटना असते. पण वास्तु शास्त्रानुसार सकाळी लवकर काही कामासाठी बाहेर पडताना विशिष्ट वस्तू हातातून खाली पडणे हे अशुभ लक्षण मानले जाते.

या अपशकुनामुळे मोठे दुर्दैव, आर्थिक किंवा कौटुंबिक संकट उद्भवू शकते, असे मानले जाते. त्यामुळे जर सकाळी तुमच्या हातातून खालील वस्तू हातातून पडल्यास व्यक्तीने सावधगिरी बाळगावी, असे सांगितले जाते.

दूध - वास्तुशास्त्रानुसार दूध हे समृद्धी, विपुलता आणि शुभ ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. सकाळी दूध सांडणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ संपत्ती, समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे आर्थिक व्यवहार, कर्ज किंवा महत्त्वाच्या गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला जातो.

मीठ - मीठ हे स्थिरता, शांती आणि आर्थिक सुबत्तेशी जोडले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी मानले जाते. सकाळी मीठ सांडणे हे खूप अशुभ मानले जाते. यामुळे घरात कलह, वादविवाद वाढण्याची आणि घरगुती त्रास होण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली जाते.

आरसा तुटणे - आरसा सामान्यतः सौंदर्य आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. हातातून आरसा पडणे किंवा तुटणे हे संघर्ष, चिंता आणि नातेसंबंधांमध्ये बिघाड दर्शवू शकते. तर काही मान्यतांनुसार, तुटलेला आरसा येणारे त्रास आणि दुर्घटना स्वतःवर शोषून घेतो, म्हणून काही ठिकाणी तो शुभ मानला जातो. त्यामुळे तुटलेला आरसा लगेच घराबाहेर काढण्याचा सल्ला दिला जातो.

कुंकू - कुंकू हे हिंदू धर्मात वैवाहिक आनंदाचे आणि सौभाग्याचे अत्यंत महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. सकाळी लवकर हातातून कुंकू खाली पडणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. हे वैवाहिक जीवनात किंवा कुटुंबावर मोठे संकट येण्याचे, तणाव वाढण्याचे संकेत असते. त्यामुळे विवाहित महिलांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी दैनंदिन कामे अधिक काळजीपूर्वक आणि सावधगिरीने करावीत.

यामुळेच सकाळी कामावर किंवा बाहेर महत्त्वाच्या कामासाठी जाताना घाई करणे टाळावे. घाईत वस्तू पडण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे नकारात्मकता वाढू शकते. जर एखादी वस्तू पडल्यास लगेच संयम राखावा आणि नकारात्मक विचार टाळावेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)