
मगर ही मांसाहारी असते. जगातील सर्वात धोकादायक प्राण्यात तिची गिणती होते. मगरीने पाण्यात पोहणारे, काठावरील लोकांवर हल्ला केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्याच असतील. पण भारतात अशी एक मगर होती जी संपूर्णपणे शाकाहारी होती. ही मगर केरळमधील श्री अनंतपद्मनाभ स्वामी मंदिराचे संरक्षण करत होती. आता ही शाकाहारी मगर मरण पावली आहे. या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या तलावात तिचे मृत शरीर तरंगताना दिसले होते.

नर जातीची ही मगर या मंदिरातील तलावात गेल्या अनेक वर्षांपासून, काहींच्या मते जवळपास 70 वर्षांपासून होती. या मगरीचे नाव बबिया असे ठेवण्यात आले होते. बबिया गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वीपासून त्याने प्रसाद पण घेतला नव्हता. मंदिराच्या पुजाऱ्याने त्याचा नावाचा पुकारा केल्यावर तो प्रसाद घेण्यासाठी झटपट येत होता. ऑक्टोबर 2022 मध्ये त्याचा मृत्यू झाला.

तो दिवसातून दोनदा प्रसाद ग्रहण करण्यासाठी येत होता. तो तांदळात गुळ एकत्र करून तयार केलेलाच प्रसाद खात असे. मंदिरात देवाचे दर्शन घेणारे येणारे भाविक सुद्धा त्याला प्रसाद खाऊ घालत. लोक त्याला देवाचा दूत असल्याचे मानत होते.

बबिया ज्या तलावात होता, तिथे अनेक मासे पण होते. पण त्याने कधीच कोणता मासे खाल्ला नाही. या तलावात जे भाविक भक्त स्नानासाठी उतरत, त्यांना सुद्धा त्याने कधी कोणत्याच प्रकाराचा त्रास दिला नाही. त्यांच्यावर हल्ला केला नाही. या युगातील हा एक वेगळाच मगर होता.

या मगरीला मंदिराच्या प्रांगणातच पुरण्यात आले. एखाद्या महान पुजाऱ्याप्रमाणेच सन्मानाने त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारोंचा जनसमूदाय उपस्थित होता. सगळ्यांनी या अनोख्या प्राण्याबद्दल श्रद्धा व्यक्त केली.