
प्रतीक्षा.. 18 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा.. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) लाँचिंगपासून या प्रतीक्षेची सुरुवात झाली. अखेर 3 जून 2025 रोजी ही प्रतीक्षा संपली. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव केला. RCB ने 18 वर्षांनंतर हे जेतेपद पटकावलंय. त्याचसोबत विराट कोहलीच्याही आयुष्यात हा सुवर्णक्षण 18 वर्षांनंतर आला आहे.

आरसीबीने विराट कोहलीवर तेव्हा पैज लावली होती, जेव्हा त्याने टीम इंडियामध्ये पदार्पणही केलं नव्हतं. 2008 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाच तो प्रकाशझोतात आला होता.

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसल्याने त्याला आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये आरसीबीने अवघ्या 20 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. पहिल्या सिझनमध्ये विराटची कामगिरी फार उल्लेखनीय नव्हती. पण 2010 पर्यंत त्याची कामगिरी सुधारली.

2011 मध्ये विराटला रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 ते 2017 पर्यंत त्याच्या लिलावाची रक्कम 12.50 कोटी रुपये इतकी होती. 2018 मध्ये ही रक्कम वाढून 17 कोटी रुपये इतकी झाली.

2022, 2023 आणि 2024 मध्ये विराटचा लिलाव 15 कोटी रुपयांना झाला होता. दोन कोटींनी ही रक्कम कमी झाली होती. परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचा लिलाव थेट 21 कोटींवर झाला. विराट गेल्या 18 वर्षांपासून आयपीएलमध्ये आरसीबीसाठीच खेळतोय.