
आजकाल घरांमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे असल्याने विजेचा वापर वाढला आहे. यात वॉशिंग मशीनचाही मोठा सहभाग आहे. पण तुम्ही वॉशिंग मशीनचा योग्य प्रकारे वापर करून वीज बिलात लक्षणीय कपात करू शकता. नवीन वॉशिंग मशीन कमी वीज वापरतात. परंतु जुन्या मशीनची योग्य पद्धतीने हाताळणी केली तर त्यातूनही वीजेची बचत होऊ शकते.

वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी खूप कपडे भरल्याने विजेचा वापर वाढतो आणि मशीनचे नुकसानही होऊ शकते. जास्त कपड्यांचा भार फिरवण्यासाठी मशीनला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे जास्त वीज लागते.

ड्रम पूर्ण भरलेला असल्यास पाणी आणि डिटर्जंट कपड्याच्या प्रत्येक तुकड्यापर्यंत योग्यरित्या पोहोचत नाहीत. यामुळे कपडे व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास पुन्हा धुवावे लागतात, परिणामी दुप्पट वीज खर्च होते. त्यामुळे नेहमी मशीनच्या क्षमतेनुसार कपडे भरा. ओव्हरलोडिंग टाळल्यास स्वच्छतेसोबतच वीज बचतही होईल.

वॉशिंग मशीनमध्ये सर्वात जास्त वीज पाणी गरम करण्यासाठी वापरली जाते. गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने कपडे धुतल्यास तुमच्या वीज बिलात मोठी बचत होऊ शकते. डिटर्जंट थंड पाण्यातही प्रभावीपणे काम करतात.

तसेच बहुतेक कपड्यांना गरम पाण्याची गरज नसते. फक्त खूप घाणेरड्या किंवा जास्त डाग असलेल्या कपड्यांसाठीच गरम पाणी वापरा. थंड पाण्याने धुण्यामुळे तुमची वीज दरवेळी ७० ते ८० टक्के पर्यंत वाचू शकते.

जर तुमचे कपडे कमी असेल आणि त्यासाठी तुम्ही मशीन वापरत असाल तर ही एक मोठी चूक ठरु शकते. कमी कपडे असो किंवा जास्त मशीन विजेचा तितकाच वापर करते. त्यामुळे अशावेळी मशीन पूर्णपणे कपड्यांनी भरेपर्यंत वाट पाहावी, हा सर्वोत्तम पर्याय आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा मशीनमध्ये कपडे धुवा, यामुळे खूपच कमी वीज वापरली जाते.

आजकाल बहुतेक नवीन वॉशिंग मशीनमध्ये ऊर्जा बचत किंवा इको मोड उपलब्ध असतो. ज्यामुळे आपोआप पाणी, तापमान आणि धुण्याचा वेळ कमी होतो. हा मोड कपडे चांगले स्वच्छ करतो आणि वीज देखील वाचवतो. तुमच्या मशीनमध्ये हे फीचर असल्यास, ते नेहमी वापरा.

मशीन स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवल्याने वीज वापर कमी होतो. प्रत्येक १० ते १५ वॉशिंगनंतर मशीनचे फिल्टर स्वच्छ करा. फिल्टर घाणीने भरला असल्यास, मशीनला जास्त काम करावे लागते आणि जास्त वीज लागते. यासाठी महिन्यातून एकदा गरम पाणी आणि व्हिनेगर वापरून मशीन सुरु करा. यामुळे मशीन आतून स्वच्छ राहिल. तसेच त्याची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकते.