
राज्यात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. दिवसभर शेतात मोलमजुरी करायची आणि रात्री पाण्यासाठी वणवण करायची असं भयाण चित्र राज्यभर दिसत आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तर पाण्याची भीषण स्थिती दिसत आहे. पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांना रात्री पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वाडा तालुक्यातील अवघ्या 40 घरांची वस्ती असलेल्या गावठाण पाड्यात पाणीच नाहीये, त्यामुळे या महिलांना दिवसा मोलमजुरी करून रात्री पाण्याच्या शोधात पाड्याच्या बाहेर पडावं लागत आहे.

टीव्ही9ची टीम गावठाण पाड्यात रात्री 2 वाजता पोहोचली. त्यावेळी अख्ख्या गावात काळाकुट्ट अंधार होता. पण पाड्यापासून दूर हाकेच्या अंतरावर महिलांचा आवाज येत होता. भांड्यांचाही आवाज येत होता. त्यामुळे आमची टीम त्या दिशने गेली. तेव्हा बॅटरीच्या उजेडात काही महिला विहिरीवर पाणी भरताना दिसल्या.

या महिला रात्रभर पाण्यासाठी जाग्या राहतात. प्रत्येक महिलेला दोन हांडे मिळतात. याच पाण्यावर आमचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम करावा सुरू होतो, असं या महिला सांगतात. रात्रीपासून ते सकाळपर्यंत महिलांची पाण्यासाठी धडपड सुरु राहते. दिवसा प्रचंड ऊन असल्याने पाणी मिळत नाही. विहिरीने तळ गाठला आहे. पिण्यासाठी जेमतेम पाणी मिळते. अंघोळीला तर पाणीच मिळत नाही, असंही या महिला सांगतात.

विहिरीवर पाण्यासाठी महिलांची चढाओढ सुरु असते. त्यांच्यासोबत लहान लहान मुलीही असतात. विंचू काट्याची भीती वाटत नाही. कारण पाणी हवंय. अगोदर गेलेल्या महिला पाणी आणल्यानंतर दुसऱ्या महिला पाण्यासाठी विहिरीवर नंबर लावतात. प्रत्येकीला पाणी मिळेल याची खबरदारी या महिला घेत असतात.

पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. लोकप्रतिनिधींनी सुद्धा या समस्येकडे कानाडोळा केल्या. आज या महिलांना पाण्यासाठी रात्र काढावी लागते. विकास होतच राहील. पण आम्हाला पाणी कधी देणार? असा सवाल हे ग्रामस्थ करत आहेत.