
भारतीय घरांमध्ये गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती खाणं हे एक प्रमुख आणि अविभाज्य अन्न आहे. पराठा, पुरी किंवा रोजच्या चपात्या बनवण्यासाठी महिलांना दररोज मोठ्या प्रमाणात पीठ मळावे लागते.

कामाच्या सोयीसाठी अनेक महिला आदल्या रात्रीच पीठ मळून ठेवतात किंवा उरलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवून ते दुसऱ्या दिवशी वापरतात. मात्र, आता एका फिटनेस प्रशिक्षकाने या सामान्य पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

त्यांच्या मते, फ्रिजमध्ये मळून ठेवलेले पीठ वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फिटनेस प्रशिक्षक प्रियांक यांच्या मते, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले पीठ २४ तासांच्या आत निरुपयोगी होते आणि त्यानंतर त्याचा वापर करणे टाळावे.

पिठाला थंड तापमानात ठेवल्यावर किण्वन (Fermentation) प्रक्रिया थांबत नाही, तर ती मंदावते. पिठातील यीस्ट आणि बॅक्टेरिया थंड तापमानात हळू हळू कार्यरत राहतात, ज्यामुळे कालांतराने अधिक कार्बन डायऑक्साइड (Carbon Dioxide) तयार होतो.

या प्रक्रियेमुळे केवळ पिठाचा पोत आणि चव बदलत नाही, तर त्याचे रासायनिक स्वरूपही बदलते. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्यास आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ किण्वन झाल्यामुळे पिठामधील ग्लूटेन कमकुवत होते. अशा पिठापासून बनवलेली चपाती चिवट लागते. ती पचायला कठीण असते. परिणामी, गॅस, ॲसिडिटी आणि पोटफुगी यांसारख्या पचनाच्या समस्या वाढू शकतात.

पीठ जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये साठवल्यास, त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी होऊ शकतात. या पिठापासून बनवलेल्या चपातीपासून तुमचे पोट भरेल. पण शरीराला आवश्यक असलेले पुरेसे पोषण मिळत नाही.

फ्रिजमध्ये साठवलेले पीठ, खोलीच्या तापमानातील पिठापेक्षा लवकर स्टार्चचे साखरेत रूपांतर करते. यामुळे अशा चपात्या खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा आहार धोकादायक ठरू शकतो.

त्यामुळे शक्यतो ताज्या मळलेल्या पिठाचा वापर करूनच चपात्या बनवाव्यात. मळलेले पीठ २४ तासांपेक्षा जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. जर तुम्हाला पीठ जास्त काळ साठवायचे असेल, तर मळलेले (कणिक) पीठ न साठवता कोरडे गव्हाचे पीठ साठवणे हा अधिक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)