
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये विराट कोहलीने दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं. पहिल्या सामन्यात 135, दुसऱ्या मॅचमध्ये 102 आणि तिसऱ्या सामन्यात 65 धावांची इनिंग खेळला. यात रांची येथे झळकावलेलं वनडेमधील 52 वं शतक त्यांच्यासाठी खास होतं.

या प्रदर्शनाच्या बळावर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड मिळवला. हा पुरस्कार मिळवण्याची त्याची 20 वी वेळ आहे. या खेळीनंतर विराट कोहलीने एक मोठं स्टेटमेंट केलय. विराटचा सध्याचा फॉर्म अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.

विराट कोहलीच्या या दमदार प्रदर्शनाच सर्वात मोठं कारण फ्री माइंडसेट आहे. विराटानुसार मागच्या 2-3 वर्षात त्याने इतक्या फ्री माइंडसेटने फलंदाजी केली नव्हती. विराट त्याच्या प्रदर्शनाबद्दल बोलला की, "या सीरीजमध्ये मी ज्या प्रकारची फलंदाजी केली, ते माझ्यासाठी समाधानकारक आहे" "मागच्या 2-3 वर्षात मला अशा प्रकारचा फ्री माइंडसेट जाणवलाच नव्हता. मी जेव्हा अशा प्रकारची फलंदाजी करतो, तेव्हा कुठलीही स्थिती टीमच्या बाजूने करु शकतो असा विश्वास असतो" असं विराट म्हणाला.

सीरीजमध्ये कोहलीने एकूण 12 सिक्स मारले. त्याच्याशिवाय एकही खेळाडू 10 सिक्सच्या जवळ पोहोचू शकला नाही. विराट म्हणाला की, "जेव्हा मी मोकळेपणाने खेळतो, तेव्हा मला माहित असतं की, मी सिक्स मारु शकतो. मला फक्त थोडी मजा घ्यायची होती. कारण मी चांगली बॅटिंग करत होतो. फक्त थोडा धोका पत्करायचा होता" रांचीमधील इनिंग आपल्याला आवडली असं त्याने सांगितलं.

"मी ऑस्ट्रेलिया टूर नंतर एकही मॅच खेळलो नव्हतो. मैदानावर उतरल्यानंतर तुम्हाला समजतं तुम्ही कुठला चेंडू चांगला हिट करताय. त्या दिवसाची एनर्जी तुम्हाला माहित असते. तुम्ही धोका पत्करायला तयार असता. रांचीची इनिंग माझ्यासाठी खास आहे, कारण त्यानंतर मला मोकळेपणा जाणवला. याआधी मला असं वाटलं नव्हतं. मी या तीन मॅचच्या रिझल्टसाठी आभारी आहे" असं विराट म्हणाला.