
मंदिरातील फुलं, प्रसाद किंवा तुळशीची पानं ही अत्यंत पूजनीय असतात. परंतु कधीकधी अनवधानाने या गोष्टी आपल्या पायाखाली येतात किंवा आपला पाय त्यांच्यावर पडतो. मग अशा वेळी काय करावं, असा प्रश्न एका भक्ताने वृंदानमधल्या प्रेमानंद महाराज यांना विचारला.

"मंदिरातील पूजनीय गोष्टी जेव्हा खाली पडतात किंवा पायाखाली येतात, तेव्हा मन खूप अस्वस्थ होतं. अशा वेळी काय करावं", असा सवाल त्या भक्ताने विचारला.

त्यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले, "जर मंदिरात फूल किंवा तुळशीचं पान खाली पडलेलं दिसलं, तर आपण ते उचलून कपाळावर लावावं किंवा खिशात ठेवावं. असं केल्याने देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहते आणि तुमचे पुण्य खराब होत नाहीत."

"ती फुलं आणि तुळशीचं पान देवाच्या चरणी वाहिले जातात. त्यामुळे त्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. प्रसादातील फूल, तुळशीचं पान जमिनीवर पडलेलं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करून ते तसंच जमिनीवर ठेवणं योग्य नसतं. देवाची नजर सदैव आपल्यावर असते", असंही ते म्हणाले.

याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, "अनेकदा गर्दीच्या ठिकाणी आपण नीट लक्ष देऊ शकत नाही. परंतु जेव्हा जेव्हा शक्य होईल, तेव्हा जमिनीवरील फूल किंवा प्रसाद उचलावं. चुकून जरी या गोष्टी हातातून खाली पडल्या, तरी त्यांना कपाळावर लावून सन्मान दिला पाहिजे. असं केल्याने आपलं मनसुद्धा शांत होतं आणि देवाची माफी मागण्याची एक संधी मिळते."