
जगात बहुतेक ठिकाणी महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो. यालाच पगारातील लिंगभेद (Gender Pay Gap) असे म्हटले जाते. ही समस्या अमेरिका, युरोपसारख्या श्रीमंत देशांमध्येही आहे. जगभरात महिला पुरुषांपेक्षा सरासरी २० टक्के कमी कमावतात.

पण जगात एक असा देश आहे, जिथे हे चित्र पूर्णपणे उलट आहे. युरोस्टॅट नावाच्या संस्थेच्या अहवालानुसार, लक्झेंबर्ग हा एकमेव असा देश आहे, जिथे महिला पुरुषांपेक्षा जास्त पैसे कमावतात. विशेष म्हणजे लक्झेंबर्ग हा एक श्रीमंत आणि आनंदी देश आहे.

लक्झेंबर्ग या देशातील महिला पुरुषांपेक्षा फक्त ०.७ टक्के जास्त पगार घेतात. या देशाने स्त्री-पुरुष समानतेसाठी खूप चांगले कायदे आणि नियम बनवले आहेत. या देशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये खूप महिला काम करतात. या नोकऱ्यांमध्ये पगार चांगले असतात.

लक्झेंबर्गने समान कामासाठी समान वेतन देणारा कठोर कायदा लागू केला आहे. २०१६ मध्ये, या देशाने एक कायदा केला, ज्यामुळे पगारात लिंगावर आधारित फरक करणे बेकायदेशीर ठरवण्यात आले. जर एखाद्या कंपनीने कोणताही योग्य कारण नसताना पुरुष आणि महिलांच्या वेतनात फरक केला, तर त्या कंपनीला मोठा दंड (Fine) भरावा लागतो. यामुळे कंपन्यांना समान पगार देणे बंधनकारक झाले आहे.

लक्झेंबर्ग सरकारने महिला आणि पुरुषांना पालकत्व रजा आणि मुलांची काळजी घेण्यासाठी इतर सुविधांमध्ये समान अधिकार दिले आहेत. यामुळे, केवळ महिलांवरच नव्हे, तर पुरुषांवरही कुटुंबाची जबाबदारी समानपणे वाटली जाते.

जेव्हा पुरुषही रजा घेऊन मुलांची काळजी घेतात, तेव्हा महिलांना त्यांच्या कामातून ब्रेक घ्यावा लागत नाही. त्यांची नोकरीतील प्रगती थांबत नाही. या धोरणांमुळे महिलांना नोकरी आणि कुटुंबाची काळजी या दोन्हीमध्ये चांगला समतोल राखणे सोपे होते, ज्यामुळे त्या उच्च-पगार असलेल्या पदांवर टिकून राहू शकतात.