
राजस्थानच्या उदयपुरमध्ये अमेरिकेतील दिग्गज उद्योगपती राजू रामलिंगा मंटेना यांची कन्या नेत्रा मंटेनाचे लग्न होत आहे. या लग्नाला जगभरातील प्रमुख हस्तींच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. सूत्रांच्या मते, हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींव्यतिरिक्त राजकारण आणि उद्योगजगतातील दिग्गजही हजेरी लावणार आहेत. आता नेत्रा मंटेना आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया तिच्याविषयी...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे वामसी गडिराजू आणि नेत्रा मंटेना यांनी आपल्या विवाह सोहळ्यासाठी ‘तलावांचे शहर’ उदयपुरची निवड केली आहे. विवाह सोहळ्याचे कार्यक्रम 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. हे कार्यक्रम प्रसिद्ध उदयपुर सिटी पॅलेसच्या माणक चौक आणि जनाना महलासह जगमंदिर आणि द लीला पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहेत.

या लग्नासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हे 21 नोव्हेंबरला कुटुंबासह उदयपुरात दाखल होण्याची शक्यता आहे आणि ते चार दिवस थांबणार आहेत. सोहळ्यात संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव जेनिफर लोपेझ आणि दक्षिण आफ्रिकेतील डीजे-प्रोड्यूसर ब्लॅक कॉफी हेही आपले कार्यक्रम सादर करणार आहेत. सूत्रांच्या मते, 600 पाहुण्यांमध्ये हृतिक रोशन, शाहिद कपूर आणि रणबीर कपूरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

नेत्रा मंटेना या अमेरिकेतील औषध क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती राजू रामलिंगा मंटेना आणि पद्मा मंटेना यांची कन्या आहेत. त्या मूळचे दक्षिण भारतीय असलेले तरी अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेले वामसी गडिराजू यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. विवाह सोहळ्यात अनेक मोठ्या हस्तींच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

उदयपूर शहरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. सिटी पॅलेसच्या जनाना महलात 21 नोव्हेंबरला ‘म्युझिक नाइट’ होईल. हळद 22 नोव्हेंबरला असेल आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला सकाळी जगमंदिरात विवाह सोहळा पार पडणार आहे. तसेच त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन देखील ठेवण्यात आले आहे.