
अवघ्या तीन दिवसांच्या पावसाने मुंबई मोनोरेलच वास्तव लोकांना दाखवून दिलय. मंगळवारी संध्याकाळी 6.15 च्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेली मोनोरेल मुंबईच्या मैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्टेशन्सच्यामध्ये एलिवेटेड ट्रॅकवर अचानक थांबली. यानंतर आतमध्ये एकच गोंधळ उडाला.

मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी होते. बराचवेळ मोनोरेल एकाचजागी थांबून असल्याने आतमधले प्रवासी टेन्शनमध्ये आले. एसी आणि लाइट बंद असल्याने आपण गुदमरतोय असं लोकांना वाटू लागलं. आतामध्ये एकच गोंधळ, आरडाओरडा सुरु झाला. काही लोक बेशुद्ध झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

आता प्रश्न हा निर्माण होतो की, 3000 कोटी खर्चून बांधण्यात आलेली ही मोनोरेल अचानक फेल कशी झाली?. मुंबई मोनोरेलची सुरुवात कधी झाली? ती कुठल्या स्टेशनपासून कुठपर्यंत जाते? हे जाणून घ्या.

मुंबईत काल प्रचंड पाऊस झाला. यामुळे उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली. अशा स्थितीत लोकांकडे फार पर्याय नव्हते. म्हणून लोकांनी मोनोरेलचा मार्ग निवडला. जास्त प्रवासी संख्येमुळे मोनोरेलमध्ये वीज पुरवठा बाधित झाला. ट्रेनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले. यामुळे मोनोरेल बंद पडली. मुंबईत मागच्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे रस्ते, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली आहेत.

मुंबई मोनोरेलची सुरुवात 2 फेब्रुवारी 2014 रोजी झाली. त्याच उद्घाटन फेब्रुवारी 2014 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. मोनोरेलमध्ये हजारो प्रवासी प्रवास करतात. मुंबईत गर्दीच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक कमी करणं तसच लोकल ट्रेन आणि मेट्रोला जोडण्यासाठी मोनोरेलची निर्मिती झाली. अंदाज असा होता की, दररोज यातून लाखो लोक प्रवास करतील, पण 15 ते 20 हजार प्रवासी प्रवास करतात.