
भारतीय घरांमध्ये किंवा हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर ताटात बडीशेप आणि खडीसाखर दिली जाते. ही केवळ पाहुणचाराची पद्धत नसून, त्यामागे आरोग्याचे मोठे शास्त्र दडलेले आहे. अनेकजण याला फक्त माऊथ फ्रेशनर समजतात, परंतु बडीशेप हा औषधी गुणांचा खजिना आहे.

बडीशेपमध्ये असणारी नैसर्गिक तेले (Essential Oils) पोटातील पाचक रसांचा स्राव वाढवण्यास मदत करतात. यामुळे जड अन्न लवकर पचते. जर तुम्हाला अपचन, गॅस किंवा पोट फुगल्यासारखे वाटत असेल, तर जेवणानंतर थोडी बडीशेप खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

जेवणानंतर तोंडात बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता असते. ज्यामुळे श्वासाला दुर्गंधी येऊ शकते. बडीशेपमधील बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म हे जंतू नष्ट करतात. तसेच श्वास ताजेतवाना ठेवण्यास मदत करतात.

आजकलच्या धावपळीच्या जीवनात ॲसिडिटीची समस्या सामान्य झाली आहे. बडीशेप शरीरातील पित्त कमी करण्यास मदत करते. ज्यांना वारंवार छातीत जळजळ होते, त्यांच्यासाठी बडीशेप खाणे हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.

बडीशेपमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यातील व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी पोषक मानले जाते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करण्याचे काम बडीशेप करते. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

बडीशेप ही केवळ चवीसाठीच नाही तर निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त असते. आपल्या रोजच्या आहारात जेवणानंतर बडीशेपचा समावेश करणे नक्कीच फायद्याचे ठरेल.