सोनं वर्षानुवर्षे चमकतं, मग चांदीच का काळी पडते? चक्रावून टाकणारं लॉजिक एकदा वाचा
लॉकरमध्ये सुरक्षित ठेवूनही चांदी का काळी पडते आणि सोने वर्षानुवर्षे कसे चमकत राहते? यामागील धक्कादायक रासायनिक आणि वैज्ञानिक कारण नक्की जाणून घ्या.

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम सध्या भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. यामुळेच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार होत आहेत.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, सध्या २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम अंदाजे ५९,३४० रुपये इतका झाला आहे, तर शुद्ध चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम सुमारे ७२,२७० रुपयांवर पोहोचला आहे.

चांदी आणि सोने हे दोन्हीही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे. पण तुम्ही कधी एक गोष्ट पाहिलीत का, तुम्ही घेतलेली चांदी ही लॉकरमध्ये अत्यंत सुरक्षित ठेवूनही काळी पडते, तर दुसरीकडे सोनं वर्षानुवर्षे जसेच्या तसे कसे चमकत राहते? आज आपण यामागचे कारण जाणून घेऊया.

अनेकदा लोकांना वाटते की चांदी खोटी किंवा मिलावट असलेली असल्यामुळे ती काळी पडली, पण तसे अजिबात नाही. यामागे पूर्णपणे एक वैज्ञानिक कारण आहे. चांदी काळी पडणे ही एक नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया आहे. जेव्हा चांदी हवेच्या संपर्कात येते, तेव्हा त्यात बदल होतात.

आपल्या वातावरणात 'हायड्रोजन सल्फाईड' (Hydrogen Sulfide) नावाचा वायू अत्यंत सूक्ष्म प्रमाणात उपलब्ध असतो. जेव्हा चांदी या हायड्रोजन सल्फाईड आणि हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येते, तेव्हा त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन 'सिल्व्हर सल्फाईड' (Silver Sulfide) चा एक काळा थर चांदीवर जमा होतो. या प्रक्रियेला विज्ञानात ऑक्सिडायझेशन म्हणतात.

आपल्या शरीराचा घाम, हवेतील आर्द्रता (दमटपणा) आणि आपण वापरत असलेले अत्तर (Perfume) किंवा रासायनिक उत्पादने यांमुळे ही काळे पडण्याची प्रक्रिया अधिक जलद होते. चांदीच्या अगदी उलट गुणधर्म सोन्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे सोनं वर्षानुवर्षे चमकत राहते.

विज्ञानाच्या भाषेत सोन्याला 'नोबल मेटल' म्हणजेच एक सुप्त किंवा निष्क्रिय धातू मानले जाते. सोन्याची रासायनिक क्रियाशीलता अत्यंत कमी असते. म्हणजेच, सोन्यावर हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता किंवा हायड्रोजन सल्फाईडचा कोणताही परिणाम होत नाही.

सोनं कोणत्याही वातावरणात स्वतःचे मूळ गुणधर्म गमावत नाही. त्यामुळेच, सोनं शेकडो वर्षे जमिनीखाली गाडले गेले किंवा पाण्यात राहिले, तरी त्याला कधीही गंज चढत नाही आणि त्याची चमक कधीही कमी होत नाही.