
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. या हल्ल्यानंतर तिथं जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अनेकांनी जम्मू-काश्मीर टूरचे बुकिंग रद्द करून टाकले आहे. याच भागात आगामी तीन महिन्यांनी अमरनाथ यात्रा चालू होणार आहे. असे असतानाच आता या हल्ल्यानंतर आता यावर्षी अमरनाथ यात्रा होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेला जाण्यासाठी देशभरातील यात्रेकरू तयारी करत आहेत.

दरम्यान, यावेळची यात्रा रद्द होणार का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. ही यात्रा रद्द होणार नाही. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

श्रद्धाळूंनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या यात्रेसाठी नवी सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.

या यात्रेदरम्यान विशेष केंद्रीय कमांडर सेंटर 24 तास निगराणी ठेवणार आहे. सर्वच ट्रान्जिट कॅम्पवर कडक सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे यावेळची अमरनाथ यात्रा रद्द होणार नाही. ती नियोजित वेळेनुसार चालू होणार आहे.