
शौचालय ही केवळ एक गरज नसून आरोग्य आणि आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण जगातील सर्वात महागडे शौचालय नेमकं कुठे आहे? त्याची किंमत किती आहे? याची तुम्हाला माहितीये का? नाही ना.... आज आपण याबद्दल जाणून घेऊया.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातील सर्वात महागडे शौचालय पृथ्वीवर नाही, तर नासाच्या एंडेव्हर स्पेस शटलमध्ये अंतराळवीरांसाठी बसवण्यात आले होते. या हायटेक स्पेस टॉयलेटची किंमत सुमारे २.६ अब्ज (२६० कोटी रुपये) असल्याचे सांगितले जाते. या किंमतीत तुम्हाला भारतात दोन ते तीन आलिशान बंगले सहज बांधता येतील.

साधारणपणे, आपण महागड्या गाड्या, गॅझेट्स किंवा दागिन्यांबद्दल ऐकतो. पण जेव्हा कोट्यवधी नव्हे, तर अब्जावधी रुपये एका शौचालयासाठी खर्च होतात, तेव्हा त्याची कारणे खूप खास असतात. पृथ्वीवर शौचालय फ्लश करण्यासाठी गुरुत्वाकर्षण मदत करते. पण अवकाशातील शून्य गुरुत्वाकर्षण असते. या वातावरणात मानवी शरीरातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याच्या प्रत्येक कणावर वैज्ञानिक पद्धतीने नियंत्रण ठेवावे लागते. कोणतीही वस्तू तरंगू नये किंवा अंतराळवीरांच्या आरोग्याला धोका पोहोचवू नये म्हणून खास तंत्रज्ञान आवश्यक असते.

नासाने १९८८ ते १९९२ या काळात अंतराळवीरांच्या वापरासाठी हे खास शौचालय एंडेव्हर स्पेस शटलमध्ये बसवले होते. अवकाश शौचालये सामान्य शौचालयासारखी दिसत नाहीत किंवा ते सामान्यासारखे कार्य देखील करत नाही. अंतराळात कचरा बाहेर काढण्यासाठी आणि तो एका वेगळ्या चेंबरमध्ये जमा करण्यासाठी यात शक्तिशाली 'सक्शन सिस्टम'चा वापर केला जातो.

या शौचालयामध्ये केवळ कचरा व्यवस्थापनाचे नव्हे, तर हवेचा दाब (Air Pressure), तापमान (Temperature) आणि बॅक्टेरिया नियंत्रण (Bacteria Control) यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रणालींचाही समावेश असतो.

नासाच्या शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे केलेले संशोधन आणि अनेक प्रयोग यामागे आहेत. शून्य गुरुत्वाकर्षणात काम करणारी प्रणाली विकसित करणे हे एक मोठे वैज्ञानिक आव्हान होते. यात वापरलेले तांत्रिक उपकरणे आणि अवकाश-सुरक्षित (Space-Safe) साहित्य सामान्य साहित्यापेक्षा खूप महाग आणि विशेष असतात.

यात गळती, दोष किंवा बॅक्टेरियाचा प्रसार रोखणारे उच्च दर्जाचे सुरक्षा तंत्रज्ञान समाविष्ट आहे. कारण अवकाशात झालेली एक छोटीशी चूक देखील अंतराळवीरांसाठी जीवघेणी ठरू शकते.

जगातील सर्वात महागडे शौचालय हे केवळ एक उपयुक्त साधन नाही, तर अवघड वैज्ञानिक आणि तांत्रिक आव्हानांवर मात करून मानवाने अवकाशात मिळवलेल्या प्रगतीचे प्रतीक आहे.