
दुबईतल्या अटलांटिस द रॉयल हॉटेलमध्ये रॉयल मॅन्शन सुइट आहे, जो जगातील सर्वांत महागडा हॉटेल रुम मानला जात आहे. दोन मजल्यांवर हे सुइट असून त्यात चार बेडरुम्स, लिव्हिंग एरिया, डायनिंग रुम, किचन, बार, गेम एरिया आणि ऑफिससुद्धा आहे.

या रॉयल मॅन्शनचं एका रात्रीचं भाडं तब्बल एक लाख डॉलर म्हणजेच जवळपास 86.5 लाख रुपये इतकं आहे. या पैशांमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये आलिशान बंगला आणि कार खरेदी करता येऊ शकते.

या सुइटचं सर्वांत मोठं आकर्षण म्हणजे त्याचा टेरेस. 5124 चौरस फूटांवर हा टेरेस परसला आहे. या टेरेसवरून अरबी समुद्र आणि पाम आयलँडचा नजारा असलेला इन्फिनिटी पूल आहे. हा सुइट प्रायव्हसी सिक्युरिटी आणि पर्सनलाइज्ड सर्व्हिससाठी डिझाइन करण्यात आला आहे.

रॉयल मॅन्शन अटलांटिस ही द रॉयलचा एक भाग आहे, ज्याची मालकी केर्झनर इंटरनॅशनलकडे आहे. जी अटलांटिस वन अँड ओन्ली, सिरो आणि रेअर फाइंड्स यांसारखे ब्रँड चालवते. हे त्यांच्या आलिशान हॉटेल्स, खाजगी घरं आणि रिसॉर्टसाठी ओळखले जातात.

या सुइटची किंमत त्याच्या आलिशान सुविधा, प्रायव्हसी आणि दुबईच्या नेत्रदीपक दृश्यांवरून ठरवण्यात आली आहे. याठिकाणी वैयक्तिक प्रशिक्षक, मसाज रुम आणि बटलर सेवादेखील उपलब्ध आहेत.

दुबई व्यतिरिक्त लास वेगासमधील एम्पथी सुइटची किंमत 100,000 डॉलर इतकी आहे. तर जिनेव्हामधील रॉयल पेंटहाऊस सूटची किंमत 80,000 डॉलर इतकी आहे.