Maharashtra News LIVE : राहुरी विधानसभेची पोट निवडणुक,माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील स्पर्धेत ?
Maharashtra News LIVE Updates : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतात तीव्रतेने जाणवू लागले आहेत. घरगुती गॅसचं मुख्य संकट निर्माण झालं आहे. युद्धासह देशातील महाराष्ट्रातील अन्य महत्वाच्या राजकीय, क्रीडा, सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीत अडथळे आल्याने एलपीजी गॅसच्या आयातीवर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री (काळाबाजार) होण्याचे प्रकार समोर येत आहेत. सध्या वितरकांकडून होणारा विलंब आणि टंचाईच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ मालकांवर आली आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. एलपीजीच्या कमतरतेमुळे जी स्थिती निर्माण झालीय, त्याचे सर्व अपडेट्स आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
राहुरी विधानसभेची पोट निवडणुक,माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील स्पर्धेत ?
आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांचे सुपूत्र अक्षय कर्डिले प्रबळ दावेदार आहेत.
-
फेरीवाल्यांकडून पालिका अधिकारी रोज २५ लाखांचा हप्ता घेतात – शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील
कल्याण- डोंबिवलीमधील फेरीवाल्यांकडून पालिका अधिकारी रोज २५ लाखांचा हप्ता घेत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी केला आहे. फेरीवाल्यांविरोधात तातडीने कारवाई करा अन्यथा आदोलन करणार असल्याचा इशाराही रवी पाटील यांनी केला आहे.
-
-
नागेश जाधव याची कोथरुड येथे प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या
प्रेयसीच्या मोबाईलवरून मेसेज करून नागेश जाधव याला घरी बोलावून प्रेयसीच्या कुटुंबीयांनी विवस्त्र करून जबर मारहाण केल्याने नागेश जाधव याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागेशच्या कुटुंबियांनी केला आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा नोंद झाला आहे.
-
पुरंदर : इफ्तार पार्टीदरम्यान मोठा राडा
पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी येथे इफ्तार पार्टीदरम्यान मारहाणीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून सासवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 13 तारखेला संध्याकाळी सातच्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरातील दहा ते पंधरा जण पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी गावात इफ्तार पार्टीसाठी आले होते. तेथे पार्टी सुरू असताना काही स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
-
कोल्हापूर : पन्हाळा गडावरील हॉटेल व्यवसाय अडचणीत
अमेरिका इराण युद्ध सुरू असल्यामुळे व महाराष्ट्र राज्यामध्ये गॅसचा तुटवडा जाणू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडावरील हॉटेल व्यवसायिकांनी व्यवसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे चूल पेटवली आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.
-
-
बुलढाणा : चिखली शहरातील आठवडी बाजारातील दुकानांना लागली आग
चिखली शहरातील आठवडी बाजारातील दुकानांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार ते पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेत दुकान मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
-
राहुरी आणि बारामती पोट निवडणुकीची घोषणा
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
-
4 राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये येत्या 9 एप्रिल रोजी आसाम, केरळ या दोन राज्यांत तसेच पुद्दुचेरी या केंद्रशाशित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तामिळनाडू येथे 23 एप्रिल रोजी आणि पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
-
ऑपरेशन थेटरमध्ये आढळला ओटी असिस्टंटचा संशयास्पद मृतदेह, जालन्यात खळबळ
जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील एका हॉस्पिटलमधील ऑपरेशन थेटरमध्ये ओटी असिस्टंटचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. जालना शहरातील एका खासगी रुग्णालयातील ही घटना आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून, नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
-
धक्कादायक! केजमध्ये मुलाकडून विडलांना बेदम मारहाण
बीडच्या केज तालुक्यातील नाव्होली गावात मुलानेच आपल्या सासरच्या लोकांना सोबत घेऊन वडिलांसह बहीण आणि मेहुण्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी मुलाने त्यांच्या डोळ्यात चटणी देखील टाकली. मुलाने बेल्ट आणि लोखंडी पाईपाने वडिलांसह बहीण आणि मेहुण्याला मारहाण केली, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
-
गॅस टंचाईचा सोलापूर जिल्ह्यात मोठा फटका, लग्नाच्या स्वंयपाकासाठी चुली पेटवल्या
गॅस टंचाईचा सोलापूर जिल्ह्यात मोठा फटका
व्यवसायीक गॅसच उपलब्ध नसल्याने लग्नाच्या स्वंयपाकासाठी चुलीचा वापर
वऱ्हाडी मंडळींना चुलीवरचं जेवण
स्वंयपाकासाठी वेळ लागत असल्यानं लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलण्याची वेळ
-
परभणीत व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने हॉटेल बंद, मजुरांचे हाल
परभणीत व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने सतत वर्दळ असलेलं हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. एकूण 4 दिवसांपासून हॉटेल बंद पडल्याने व्यावसायिकांसह मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
नागपूरच्या RSS कार्यालयावर 23 मार्चला मोर्चा काढला जाणार : प्रकाश आंबेडकर
नागपूरच्या RSS कार्यालयावर 23 मार्चला मोर्चा काढला जाणार, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती इथे दिली. मुंबईमध्ये काँग्रेस, आप, कम्युनिस्ट पक्ष, 17 ते 18 सामाजिक संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. भाजपचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी मुद्रमोदी ते मुजरा मोदी अशी झाली आहे. जगभर त्यांना आता डान्सिंग मोदी म्हटलं जातंय, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
-
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दीपक वैद्य हे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथून निवडून आले आहेत. दीपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व म्हणून दीपक वैद्य यांची ओळख आहे.
-
सोलापूर जिल्हातील ग्रामीण भागाला गॅस टंचाईचा मोठा फटका
सोलापूर जिल्हातील ग्रामीण भागाला गॅस टंचाईचा मोठा फटका बसला आहे. गॅसचा तुटवड्याचा थेट फटका लग्न समारंभाला बसू लागला आहे. व्यावसायिक गॅसच उपलब्ध नसल्याने मंगल कार्यालयात स्वंयपाकासाठी चुलीचा वापर केला जाऊ लागला आहे. सर्वच जेवणाचे पदार्थ चुलीवर केले जात असल्याचा फटका मात्र लग्नात प्रत्यक्षात दिसु लागला आहे. चुलीवरील स्वंयपाकासाठी बराच वेळ लागत असल्याने लग्न वेळ पुढे ढकलावी लागत आहेत. लग्नासाठी आलेले पाहुणे-वऱ्हाडी मंडळीना जेवणासाठी उशीर होत आहे.
-
येवल्यात सायकलला मोटरसायकलची मागून जोरदार धडक….
येवल्यात सायकलला मोटरसायकलने मागून जोरदार धडक मारली आहे. येवला कोटमगाव रोडवरील अपघाताची घटना घडली आहे. या धडकेत ज्येष्ठ नागरिक सायकल स्वार सुभाष काळन यांचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकल सायकलचा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण आंदोलन
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करत धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे हे मुंबईकडे रवाना झालेत, उद्या मुंबई येथील आझाद मैदानावर सकाळी 10 वाजता दीपक बोऱ्हाडे हे उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान जालना 17 सप्टेंबर रोजी दीपक बोऱ्हाडे हे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन केले होते. दरम्यान सरकारला गेली बारा वर्षे धनगर समाजाने वेळ दिला आहे दरम्यान आता घटनादुरुस्त अधिकार मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नसल्याचा इशारा देखील आंदोलन दीपक बोऱ्हाडे यांनी दिला आहे.
-
सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अनोखा अंदाज… जिपा महोत्सवांमध्ये सादर केला बहारदार डान्स.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा एक अनोखा अंदाज समोर आला. जिल्हा परिषदेच्या जिपा महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी आपल्यातली अदाकारी सादर केली. अक्षय कुमार व परेश रावल यांच्या हेराफेरी चित्रपटातील एका सुरेख आणि कॅमेडी गाण्यावर विशाल नरवाडे चांगलेच थिरकले , यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकारयांनी देखील त्यांना चांगलीच साथ दिली.तर प्रशासनावर बचत आणि नेहमीच फायलींच्या घराडयात असणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बहारदार नृत्याला उपस्थित त्यांनी चांगलीच दाद दिली.
-
गडचिरोलीत एलपीजीचा मोठा तुटवडा; हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस सिलेंडरची भीषण कमतरता भासत असून, याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. जिल्ह्यातील गडचिरोली शहरासह भामरागड, एतापल्ली, अहेरी आणि सिरोंचा यांसारख्या दुर्गम भागातील हॉटेलमध्ये गॅस संपल्याने व्यावसायिकांनी नाईलाजास्तव लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक आणि नाश्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, अनेक ठिकाणच्या गॅस शेगड्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. केवळ व्यावसायिकच नव्हे, तर घरगुती गॅस ग्राहकांनाही आता ४५ दिवसांतून एकदाच सिलेंडर मिळेल, अशी सूचना गॅस एजन्सीकडून देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. या इंधन संकटामुळे दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
नवी मुंबईत औद्योगिक संकट, हजारो कारखान्यांना युद्धाचा फटका
आशिया खंडातील सर्वात मोठी उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्याला जागतिक युद्धाच्या परिस्थितीचा भीषण फटका बसला आहे. कच्च्या मालाचे गगनाला भिडलेले भाव आणि आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे या क्षेत्रातील तब्बल साडेचार हजार कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, येत्या आठवड्यात यातील ५० टक्के कारखाने बंद पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनने व्यक्त केलेल्या भीतीनुसार, जर हे कारखाने बंद झाले, तर नवी मुंबईतील सुमारे १० लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. उद्योजक आणि कामगार संघटनांनी या संकटकाळात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
-
संसदेचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपचे राहुल गांधींविरोधात आंदोलन
संसदीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या २० खासदारांनी संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे कृत्य केल्याचा आरोप करत आज सातारा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. सातारा येथील ऐतिहासिक पोवई नाका परिसरात गोळा झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. विरोधकांकडून सातत्याने चुकीच्या अफवा पसरवून देशात अराजकता माजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जनतेने अशा कोणत्याही दिशाभूलीला बळी पडू नये,” असे आवाहन भाजप सातारा शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर यांनी यावेळी केले.
-
पुणे मेट्रोचा चहुबाजूंनी विस्तार होणार; महापालिका सर्वतोपरी सहकार्य करणार – गणेश बिडकर
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा विस्तार आता सर्व दिशांनी करण्यात येणार असल्याची ग्वाही पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे. पुण्याच्या वाढत्या विस्तारानुसार शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात मेट्रो पोहोचवण्याचे नियोजन असून, या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने जे काही आवश्यक सहकार्य लागेल, ते सर्व उपलब्ध करून दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. मेट्रोच्या या विस्तारामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिकेने मेट्रो प्रशासनाला खंबीर पाठिंबा दर्शवला आहे.
-
गॅस टंचाईचा बिर्याणी केंद्रांना मोठा फटका; कोळशावर स्वयंपाक करण्याची वेळ
ठाण्यातील राबोडी परिसरात सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बिर्याणी व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत. युद्धाच्या जागतिक परिस्थितीचा परिणाम स्थानिक पुरवठा साखळीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्याने अनेक व्यावसायिकांना आता कोळशावर बिर्याणी बनवावी लागत आहे. विशेषतः मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाच ही समस्या उद्भवल्याने इफ्तार आणि इतर वेळेचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. “वेळेवर गॅस मिळत नसल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे,” अशा शब्दांत व्यावसायिक आणि ग्राहकांनी आपला संताप व्यक्त केला असून, सरकारने तसेच गॅस एजन्सीने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राबोडीतील जनतेकडून केली जात आहे.
-
परभणीत व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यावसायिक इलेक्ट्रिक भट्टीकडे वळले
परभणी शहरात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून, याचा गैरफायदा घेत गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे. १६५० रुपयांना मिळणारे सिलिंडर तब्बल २८०० रुपयांना विकले जात असल्याने हॉटेल चालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या वाढत्या महागाईला आणि टंचाईला पर्याय म्हणून आता अनेक व्यावसायिकांनी गॅस सोडून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करण्यावर भर दिला आहे.
-
निर्यात घटल्याने अंड्यांचे दर घसरले
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता पोल्ट्री व्यवसायावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. ओमान तसेच इतर अरब देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात अंडी निर्यात केली जात होती. मात्र युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने अंड्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा साठा वाढू लागला असून त्याचा थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर झाल्याचे दिसून येते.
-
पुण्यातील धक्कादायक प्रकार , प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या
पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दहा जणांविरुद्ध कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियसीने मोबाईल वरून मेसेज करून बोलून घेतलं असं सांगत प्रेयसीच्या घरच्यांनी प्रियकराचा घेतला जीव. हत्या केलेल्या प्रियकराचं नागेश जाधव असं नाव असे आहे.
-
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन
धुळे येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. नाम नरेंद्र गायब सिलेंडर.. गॅस दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा आंदोलन. सिलेंडर गॅस दरवाढीचा आणि टंचाईचा करण्यात आला निषेध. नरेंद्र मोदी यांनी गटारीतून गॅस टेक्नॉलॉजी काढली होती अशा वक्तव्याचा निषेध.
-
महापौर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का?- किशोरी पेडणेकर
नियमांना ब्रेक लावत, महापौरांच्या गाडीला दिवे लावले अशी टीका किशोरी पडणेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी महापौर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? असा सवाल केला आहे.
-
नवी मुंबईच्या APMCमार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरांत घसरण
नवी मुंबईच्या APMCमार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरांत घसरण झालीये…भाज्यांच्या दरांत 10 ते 15 रुपयांची घसरण झालीये…निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने भाज्यांचे दर घसरले आहे…
-
कांदिवली पश्चिमेकडील कपोल शाळेजवळ घरगुती गॅस सिलिंडरसाठी लांब रांग
मनसे नेते दिनेश साळवी यांनी काळाबाजार केल्याचा आरोप केला आहे, ही लाईन दाखवून या मागे गॅसचा तुटवडा आहे हे दाखवून काळाबाजार होण्याची दाट शक्यता आहे. गॅसचा तुटवडा नाही तर ओ टी पी आलेल्या ग्राहकांना लाईनीत का उभे राहावे लागत आहे ? त्यांच्या घरपोच गॅस सिलेंडर दिले का जात नाही? असे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहेत.
-
नालासोपाऱ्यात विवाहितेची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
नालासोपाऱ्यात एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळीने हत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळीने केला आहे. काजल मौर्या असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव असून, नालासोपारा पूर्व संतोषभूवन बावशेत पाडा येथील रहिवासी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप ही स्पष्ट झाले नाही मात्र सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नालासोपारा पूर्व पेल्हार पोलीस ठाण्यात याबाबत प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस याचा तपास करीत आहेत.
-
नागपुरात गॅस टंचाई आणि दर वाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
नागपुरात गॅस टंचाई आणि दर वाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन सुरुआहे. नागपुरातील संविधान चौकात आंदोलन होत आहे. हातात बॅनर पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं जातं आहे.
-
निफाड : युद्धामुळे अभूतपूर्व गॅस टंचाई
निफाड येथे युद्धामुळे अभूतपूर्व गॅस टंचाई निर्माण झाली आहे. सिलेंडर मिळत नसल्यमुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चुलीची मागणी वाढली आहे. निफाड तालुक्यातील वेळापूर येथील कुंभारला रोजगार मिळाला. दररोज 100 ते 125 कॉंक्रिटी चुलींची होलसेलमध्ये तर पाच ते दहा चुलींची रिटेल मध्ये विक्री होत आहे.
-
गॅस तुटवडा सरकारनं गांभीर्यानं घेतलेला नाही-आमदार अमित देशमुख
इराण इस्रायल युद्ध सुरू होणार याची कल्पना कदाचित भारत सरकारला असावी कारण त्याच्याकडे तश्या यंत्रणा असतात. मात्र त्यांनी वेळीच पर्यायी व्यवस्था काही केली नाही. जिथे युद्ध नाही त्या देशातून गॅस आणि तेल मागवता आले असते. पण तसे काही झाले नाही कारण तुटवडा झालेला आहे. जेव्हढ गांभीर्याने हा तुटवडा सरकारने घ्यायला पाहिजे होता तेव्हढा घेतलेला नाही. असं काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी म्हटलेले आहे.
-
गोंदियाच्या वडेगाव/बंध्या येथे जंगली हत्तींचा 4 दिवसांपासून धुमाकूळ
गोंदियाच्या वडेगाव/बंध्या येथे जंगली हत्तींचा 4 दिवसांपासुन धुमाकूळ पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, पाईप लाईन व मका पिक जमीनदोस्त केली आहेत, प्राचीन काळापासून असलेल्या खोळ्या देवाच्या देवघराची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.
-
ठाण्याच्या मुरबाडमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी
ठाण्याच्या मुरबाडमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलीये. गॅस पुरठ्यात विलंब होत असल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्यात.
-
सोलापूर : भाजपाकडून राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने
भाजपाकडून राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने सुरु करण्यात आली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन करण्यात आले आहे. सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल तसेच भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे.
-
सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील विद्यार्थी उपहारगृहाला गॅस तुटवड्याचा फटका
व्यावसायिक गॅस पुरवठा होत नसल्याने अनेक पदार्थ बनवणे बंद केले. वेळेत गॅस मिळाला नाही तर मेस आणि हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आमच्यावर येईल.शासकीय रुग्णालयातील विद्यार्थी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना याचा फटका बसू शकतो.
-
हवामान बदलामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत
धाराशिव जिल्ह्यामध्ये हवामान बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत सीझनच्या वेळी हवामान बदल झाल्यामुळे आंब्याचा तौर आणि नव्याने लागलेले आंबे गळती सुरू असल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलाय यासंदर्भात पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांनी पाहुयात
-
महसूल विभागाची कल्याण तालुक्यात अवैध खननाविरोधात मोठी कारवाई
२४ दगड खाणी आणि स्टोन क्रशर युनिट्स अधिकाऱ्यांकडून सील. बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी ९ युनिट्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल. मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सरकारी आणि खासगी जमिनीवर परवानगीशिवाय उत्खनन केल्याचा आरोप. उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या नेतृत्वाखाली तपासणी मोहीम
-
23 मार्च रोजी होणाऱ्या विशेष महासभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार
ठाणे परिवहन सेवेचा अर्थसंकल्प या दिवशी सादर केला जाणार आहे..स्थायी समिती अद्याप स्थापन न झाल्याने 2026 -27 चा अर्थसंकल्प आता थेट महासभेला सादर केला जाणार आहे. ठाणेकरांना नव्या कोणत्या सुविधा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा कोणत्याही स्वरूपाची करवाढ अथवा दरवाढ नसल्या अर्थसंकल्प असणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली..
-
विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरू
तब्बल २० वर्षांनंतर प्रत्यक्ष निवडणुकीतून संघाला नवा अध्यक्ष आणि २२ कार्यकारिणी सदस्य मिळणार. अध्यक्षपदासाठी डॉ. गिरीश गांधी, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. रंजन दारव्हेकर, डॉ. श्रीपाद जोशी आणि प्रदीप दाते हे पाच उमेदवार रिंगणात. कार्यकारिणीच्या २२ जागांसाठी ८३ उमेदवारांमध्ये चुरस.७ हजार ४९३ मतदारांना पाठवलेल्या मतपत्रिकांपैकी ४ हजार ९३५ मतपत्रिका संघाकडे प्राप्त.
-
धाराशिवमध्ये गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आक्रमक; साठेबाजांवर धाडी टाकण्याचे आदेश
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि येरमाळा येथील आगामी यात्रांच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा भासू नये आणि काळाबाजार रोखला जावा, यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः यात्रा कालावधीत व्यापाऱ्यांना लागणाऱ्या गॅस मागणीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच घरगुती गॅसच्या शिल्लक साठ्याचा दररोज आढावा घेतला जाणार आहे. जर कुठेही गॅसची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास तात्काळ धाडी टाकून साठा जप्त करण्याच्या सूचना पोलिसांनी देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना गॅस सुलभतेने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
-
नाशिक शहरात १५ मार्चपासून शस्त्र आणि जमावबंदी लागू; पोलिसांचा कडक इशारा
नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते २९ मार्चपर्यंत शस्त्र आणि जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. या काळात शहरात कोणत्याही प्रकारची सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी लग्नकार्य, धार्मिक मिरवणुका, तालुक्याचे आठवडे बाजार किंवा अंत्ययात्रा यांच्यासाठी जमणाऱ्या जमावास या आदेशातून सवलत देण्यात आली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा गटावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे. शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
-
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला असून, जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागांत १७ ते २० मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कडक उन्हाचा कडाका जाणवत असला तरी, उद्यापासून तापमानात मोठी घट होऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. रब्बी हंगामातील गहू आणि इतर पिके सध्या काढणीला आली असतानाच, या नैसर्गिक संकटामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य सुरक्षित जागी साठवणूक करावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
-
KDMC मध्ये भाजपची फिल्डिंग; स्थायी समिती सभापती पदासाठी शड्डू ठोकला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची महासभा जवळ येत असतानाच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून भाजपने स्थायी समिती सभापती पदावर आपला ठाम दावा ठोकला आहे. महासभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची पालिकेत एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये सर्व नगरसेवकांनी ‘वज्रमूठ’ आवळत सभापती पद भाजपलाच मिळावे, अशी एकमुखी मागणी केली आहे. सध्या केडीएमसीमध्ये महापौरपद शिवसेना (शिंदे गट) कडे असून उपमहापौरपद भाजपकडे आहे; मात्र आता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
गणिताचे उत्तर चुकले म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण; नागपुरातील संतापजनक प्रकार
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील देवळी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १० मार्च २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत विद्यार्थिनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या मारहाणीनंतर संबंधित शिक्षकाने पालकांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी चाईल्ड हेल्पलाईनच्या चमूने तातडीने दखल घेत पीडित मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली. ज्यानंतर दोषी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.
-
४ वर्षांनंतर नागपूर मनपाची पहिली महासभा; नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता
नागपूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण महासभा २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून, चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर ही सभा वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत. या काळात नागरिकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नव्हते, परंतु आता नगरसेवकांच्या माध्यमातून शहरातील मूलभूत सुविधांचे प्रश्न थेट सभागृहात गाजणार आहेत. विशेषतः उन्हाळ्यातील पाणीटंचाई, सदोष पाणी बिले, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि शहरातील ग्रीन जिमची झालेली दुरवस्था या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.
-
मिरा रोडमध्ये मनसेचा खळ्ळ् खट्याक; हॉटेलच्या गुजराती पाटीला फासले काळे
मिरा रोड येथील एक्सप्रेस हायवेवर असलेल्या ‘अमर पॅलेस’ या उपहारगृहाने मराठी भाषेला डावलून केवळ गुजराती भाषेत नामफलक लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बाब निदर्शनास येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तातडीने हॉटेल गाठले आणि मराठी भाषेचा अवमान केल्याबद्दल संताप व्यक्त करत गुजराती भाषेतील पाटीला काळे फासले. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा सन्मान राखलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मांडली.
Published On - Mar 15,2026 8:59 AM
