
मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत एकवटले आहेत. आझाद मैदान हजारो आंदोलकांनी गच्च भरलं आहे. मुंबईच्या रस्त्यावर सगळीकडे आंदोलक दिसत आहेत. दरम्यान, हेच आंदोलन चालू असताना आता एक दुर्दैवी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे मराठा कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत तरुण लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

विजय घोगरे असे मृत्यू पावलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईकडे कूच करताना जुन्नर येथे एका मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानमंतर आज पुन्हा मुंबई येथे आंदोलनात सहभागी असलेल्या विजय घोगरे या मराठा कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हा तरुण लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर या तरुणाला उपचारासाठी जे जे रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र डॉक्टरने या कार्यकर्त्याला मृत घोषित केले आहे.

आता तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास लगेच उपचार करून घ्यावेत, असे आवाहन केले जात आहे. तसेच या मृत तरुणाला काही मदत मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.