महाराष्ट्राची अस्सल चव! झणझणीत झुणका भाकर बनवण्याची सोपी रेसिपी, घ्या जाणून
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील झुणका भाकर हा लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहे. कांदा, मिरची आणि बेसन वापरून घरच्या घरी बनवा झणझणीत झुणका. त्यासोबत ज्वारीच्या किंवा तांदूळाच्या भाकरीचाही घ्या आस्वाद

हा केवळ पदार्थ नसून महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली नाळ आहे. महाराष्ट्राच्या मातीची अस्सल चव आणि मायेचा स्वाद म्हणजेच झणझणीत झुणका भाकर.
साहित्य : झुणक्यासाठी बेसन, कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, तेल,कोथिंबीर, पाणी भाकरीसाठी : ज्वारीचं पीठ, मीठ, पीठ मळण्यासाठी गरम पाणी
सगळ्यात आधी बेसन घेऊन त्यात थोडं पाणी घाला. गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने ते नीट कालवून घ्या. मिश्रण फार पातळ किंवा घट्ट ठेवू नका.
कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी,जिरे, हिंग घाला. फोडणी तडतडली की त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घाला.त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला.
कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर हळद आणि मीठ घाला. आता तयार केलेलं बेसनांच मिश्रण कढईत ओता आणि लगेच ढवळायला सुरूवात करा.
झुणका शिजताना तो सतत ढवळत राहणं महत्त्वाचं आहे. सुरूवातीला मिश्रण थोडं ओलसर दिसेल, पण काही वेळाने बेसन शिजून घट्ट होऊ लागेल. झुणका कढईला चिटकू नये म्हणून मंद ते मध्यम आचेवर ढवळत राहा.
बेसन व्यवस्थित शिजलं आणि झुणका भुसभुशीत झाला की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झुणका झाला तयार
भाकरीसाठीचे पीठ गरम पाण्यात छान मळा. तव्यावर व्यवस्थित भाकरी फुगवा. तूप आवडत असल्यास वरून भाकरीला तूप लावा.