बीडचं बडं प्रस्थ, भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

| Updated on: Nov 30, 2022 | 10:57 AM

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले.

बीडचं बडं प्रस्थ, भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर  पोलिसांची कारवाई
Image Credit source: social media
Follow us on

बीडः जिल्ह्यातील बडे प्रस्थ भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme court) आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बीड (Beed) येथील देवस्थान जमीन बळकावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आमदार सुरशे धस आणि अन्य पाच जणांविरोधात  अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, चिंचपूर आदी देवस्थानांचे हे कथित जमीन घोटाळा प्रकरण आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जमीनी हडपण्याचे प्रकार सुरु आहेत, असे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी २०२१ मध्ये निदर्शनास आणून दिले होते.

एसआयटीकडे हा तपास सोपवण्यात आला होता. एसआयटीने अहवाल दिल्यानंतरही फौजदार कारवाई न झाल्याने हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुरेश धस यांच्याविरोधात निकाल दिला होता.

आधी फौजदारी गुन्हे दाखल करा आणि नंतर तपास करा, असे आदेश खंडपीठाने दिले होते. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या याचिकेवर खंडपीठाने निर्णय दिला होता.

पोलीस आणि एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरा, असेही खंडपीठाने म्हटले आहे. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

मात्र काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आता कोर्टाच्या आदेशानुसार, धस यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.