ठाकरे बंधू शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघालेत, गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात

5 जुलै रोजी होणाऱ्या मनसे आणि ठाकरे गटाच्या विजयी मेळाव्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाकरे बंधू शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघालेत, गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात
Gunaratna Sadavarte
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2025 | 7:14 PM

राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा म्हणून ठाकरे गट आणि मनसेने संयुक्तपणे 5 जुलै रोजी मोर्चा काढणार होते, मात्र आता सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत, त्यामुळे आता 5 जुलै रोजी दोन्ही पक्षांकडून विजयी मेळावा घेतला जाणार आहे. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्रात श्रीमंत विरुद्ध गरीब असा लढा सुरु

गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, महाराष्ट्रात श्रीमंत विरुद्ध गरीब असा एक लढा मागील काही दिवसांमध्ये सुरू झाला आहे. या बाबीला रंग देण्यात आला मराठी विरुद्ध हिंदी असा. थेट शैक्षणिक नुकसानाची भरपाई केली जाऊ शकत नाही ते नुकसान कोणाच आणि कसं ते सांगतो. अनेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना क्रेडिट मार्क बघितले जातात. उद्धव आणि राज ठाकरे यांची मूळ ज्या शाळेत शिकले त्या शाळेत तीन भाषा शिकवल्या जातात
हा लढा गरीबांचा आहे. भटके विमुक्त, शेतकऱ्यांचा, वंजारी समाजाचा , तमाम ओबीसींचा आहे.

मनसे ही विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना

सदावर्ते म्हणाले की, ‘जे अवघड काम करतात अशा कष्टकऱ्यांची लेकरं कोणत्या शाळेत जातात? जे उच्चभ्रू आहे त्यांचा प्रश्न नाही. एकीकडे श्रीमंतांना 12 क्रेडिट आणि गरिबांना 7 क्रेडिट हा असमतोल आहे. हे राज ठाकरे यांनी करायला लावलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना आहे. शिक्षणापासून वंचित ठेवणारी सेना म्हणजे मनसे. हा टुकार पण आहे.’

मुस्कटदाबी करून निर्णय रद्द करायला लावला

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, ‘स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी चालवलेले ही कुभानड आहे. सगळ्यांना आवाहन करत आहेत या विषयावर चळवळ उभी करा. गरीब आणि श्रीमंत हा विचारांची खांडोळी करणाऱ्यांविरोधात चळवळ उभी करा. शासनाला मुस्कटदाबी करून निर्णय रद्द करायला लावला. अनेक सरकारने निर्णय रद्द केलेल पहिले मात्र काल निर्णय रद्द करताना अत्यंत सूचकपणे वैज्ञानिक दृष्ट्या सांगायचा प्रयत्न केला.’

संविधान धोक्यात आहे असं लोकसभेला सांगितलं, त्याचप्रमाणे आता मराठी संदर्भात मत तयार केलं. मराठीला खतरा आहे अस सांगत ही सरकारची गळचेपी केली. वातावरण गढूळ होऊ नये म्हणून सरकारने शासन निर्णय रद्द करत आहोत असं सांगितलं. माझ्या घराच्या समोर येऊन कार्यकर्त्यांनी धिंगाणा केला. तुम्हाला गचंडीला धरून लोक तुम्हाला हिशोब विचारणार. याची जाणीव राज आणि उद्धव ठाकरे यांना होईल.

विजयी मोर्चाबाबत काय म्हणाले सदावर्ते?

मनसे-ठाकरे गटाच्या विजयी मोर्चाबाबत सदावर्ते म्हणाले की, ‘तुम्ही जो काही उत्सव साजरा करणार आहात पण हा उत्सव म्हणजे शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघाला आहात त्या बाबीचा गंभीर निषेध करतो. जो उत्सव साजरा करण्यात येणार आहे तो दिवस काळ्याकुट्ट अक्षरात नोंद होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण दळभद्री आहे. गल्लीच्या निवडणुकांसाठी हे सगळं सुरू आहे. राज ठाकरे यांची वळवळ फार टिकणारी नाही. राज ठाकरे यांच्या रोगाला कुठेतरी थांबवावं.’