APMC Election 2023 | ना रोहित पवार, ना राम शिंदे, कर्जत बाजार समितीची निवडणूक नेमकी कोणी जिंकली?

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित पवार आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत कोण बाजी मारेल? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. कारण राम शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. तर रोहित पवार हे थेट पवार कुटुंबातले सदस्य आहेत. त्यामुळे चुरस वाढलेली होती. पण निकाल अतिशय वेगळाच लागलाय.

APMC Election 2023 | ना रोहित पवार, ना राम शिंदे, कर्जत बाजार समितीची निवडणूक नेमकी कोणी जिंकली?
| Edited By: | Updated on: Apr 29, 2023 | 6:40 PM

अहमदनगर : राजकारणात आपण चढाओढ पाहतो, आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी पाहतो. निवडणुकीत आपण चुरस, धुराळा पाहतो. कोण बाजी मारतं? याचं निरीक्षण करतो. पण निकाल या सगळ्या चढाओढींच्या पलिकडे निघाला तर आपणही आपल्या डोक्याला हात लावून बसतो. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा लागलेला निकाल. अतिशय रंजक असा हा निकाल लागला आहे. विशेष म्हणजे कर्जतच्या बाजार समितीवर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार? याकडे अनेकांचं लक्ष आहे. असं असताना आलेला निकाल हा आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणणार आहे.

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यापैकी अनेकांनी बाजीदेखील मारली आहे. तर काहींना अपयश आलेलं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे अहमदनगरच्या कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल काय येतो? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. कारण या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात चांगलीच चुरस लागलेली होती.

कर्जत बाजार समितीचा नेमका निकाल काय?

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही लढत जास्त प्रतिष्ठेची होती. पण या निवडणुकीचा निकालच अनोखा लागलाय. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल अतिशय रंजक लागलाय. एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी 9 जागांवर राम शिंदे यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरित 9 जागांवर रोहित पवार यांचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

सभापती कोणत्या गटाचा होणार?

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आहे. निकालही समोर आला आहे. दोन्ही गटांचे समसमान उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आता बाजार समितीचा सभापती हे त्यांचं नशिबच ठरवणार आहे. कारण आता ‘ईश्वर चिठ्ठी’ने सभापती आणि उपसभापती ठरवला जाणार आहे. आता हे नशिब नेमकं कुणाला साथ देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

…तरीही सस्पेन्स कायम

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असला तरी सस्पेन्स कायम आहे. कारण राजकारणात कधी काय होईल याचा ताहीच भरोसा नसतो. मग ते राजकारण गाव-खेड्यातलं असो किंवा दिल्लीपर्यंतच असो. राम शिंदे आणि रोहित पवार दोन्ही गटाचे प्रत्येकी 9 उमेदवार जिंकून आले असले तरी पिक्चर अजूनही बाकी आहे, असं म्हणावं लागेल. या दोन्ही गटांमधील एकही विजेता उमेदवार फुटला तर वेगळं काहीतरी बघायला मिळू शकतं आणि नाही फुटला तर ईश्वर चिठ्ठीच सभापती ठरवण्याची शक्यता आहे.