सरकारी बंगल्यांवरील वारेमाप खर्च आवरा, अजित पवारांनी मंत्र्यांचे कान उपटले

वास्तुविशारदांच्या सल्ल्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यांवरील डागडुजीच्या खर्चात वारेमाप वाढ झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं

सरकारी बंगल्यांवरील वारेमाप खर्च आवरा, अजित पवारांनी मंत्र्यांचे कान उपटले
अनिश बेंद्रे

|

Feb 20, 2020 | 11:19 AM

मुंबई : मंत्र्यांच्या बंगल्यांचे खर्च वाढल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच हाती छडी घेतल्याचं दिसत आहे. सरकारी बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवा, अशी तंबी अजित पवारांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना दिल्याची (Ajit Pawar Ministers government bungalows) माहिती आहे.

सरकारी बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवा, अनावश्यक महागड्या वस्तूसाठी खर्च करु नका, अशी ताकीद अजित पवार यांनी दिली आहे. ‘टीव्ही9 मराठी’च्या बातमीनंतर अजित पवारांनी मंत्र्यांचे कान टोचल्याचं दिसत आहे.

वास्तुविशारदांच्या सल्ल्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यांवरील डागडुजीच्या खर्चात वारेमाप वाढ झाल्याचं काही दिवसांपूर्वी पाहायला मिळत होतं. 31 मंत्र्यांच्या बंगल्यांवर एकूण 15 कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याचा दावा केला जात आहे. प्रत्येक बंगल्यावर सरासरी 80 लाख ते दीड कोटीपर्यंत खर्च होत आहे.

मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगल्याची कंत्राटं देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अजित पवारांनी या विभागालाच खर्च आवरण्याचे निर्देश दिले.

सर्वात जास्त खर्च हा बाळासाहेब थोरातांच्या ‘रॉयल स्टोन’ आणि छगन भुजबळांच्या ‘रामटेक’ या बंगल्यावर होत असल्याची माहिती आहे. रॉयल स्टोनसाठी 1 कोटी 81 लाख, तर रामटेकसाठी 1 कोटी 48 लाखांचा खर्च होत आहे.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सारंग’ बंगल्याचाही या खर्चात समावेश आहे. फडणवीसांच्या सारंग बंगल्यावर तब्बल 92 लाख रुपयांचा खर्च केला जात आहे, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल10 पट वाढ झाली आहे. मलबार हिल येथील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने पाच वर्षात 52 कोटींची उधळण केल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कुठल्या मंत्र्याला कुठला बंगला?

सरकारी बंगले वाटपानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘देवगिरी’ बंगला मिळाला. अशोक चव्हाण यांना ‘मेघदूत’, दिलीप वळसे पाटील यांना ‘शिवगिरी’, अनिल देशमुख यांना ‘ज्ञानेश्वरी’, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ‘सातपुडा’ आणि राजेश टोपे यांना ‘जेतवन’ हे बंगले मिळाले.

छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत. आदित्य ठाकरे यांना अ-6 निवासस्थान मिळालं आहे. बच्चू कडू यांना रॉकीहिल टॉवर – 1202, विश्वजीत कदम यांना निलांबरी – 302,  सतेज पाटील यांना सुरुची-3, आदिती तटकरे यांना सुनिती -10 हे निवासस्थान मिळालं आहे.

Ajit Pawar Ministers government bungalows

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें