कोण म्हणतं मी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला?; अजितदादांनी थेट आकडेच दिले
अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला असा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावर बोलताना अजित पवारांनी आकडेवारी सादर केली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे. अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला असा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावर बोलताना अजित पवारांनी आकडेवारी सादर केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
अजित पवार म्हणाले की, ‘राज्यात मागासलेला समाज आहे. त्यांना निधी द्यायचं ठरवलं तर संख्येच्या प्रमाणात निधी दिला जातो. आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल त्याना लोकसंख्येप्रमाणे मी निधीचं वाटप करत असतो. त्याचं सूत्र आपण सर्वांनी स्वीकारलं आहे. मात्र काही लोक जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून बदनामी करत आहेत. मी सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. अजित पवारांनी बजेट वळवलं असं म्हणत आहेत.
याबाबत नरहरी झिरवळ यांना विचारा. इतरांना विचारा. या वेळी ७ लाख २० कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर करताना ४१ टक्के गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आदिवासी विभागाला वाढवून दिला. हे कधीही पुढे येतच नाही. कोणी तरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला. कार्यकर्ता हे ऐकून खचतो. मात्र त्याला सत्य माहीत नसतं’ असंही अजित दादा म्हणाले.
पुढे बोलताना अजित दादांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागात मागासवर्गीय समाज आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा ३८ टक्के निधी अधिक दिला. मुख्यमंत्र्यांनीही त्याबाबत सांगितलेलं आहे. पण त्याला जेवढी प्रसिद्धी पाहिजे तेवढी मिळाली नाही. मागासवर्गीय समाज व आदिवासी समाजाच्या मनात निधी वळवल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता, पण राष्ट्रवादीचे लोक केवळ फुले शाहू आंबेडकरांचे नाव भाषणापुरते वापरतात का? नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीत करतो.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मागच्यावेळी लोकसभेत दारूण पराभव झाला. चारच जागा मिळाल्या. ७५ टक्के पराभव स्वीकारावा लागला. तिथे थोडी गडबड झाली. कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल झाली. काय झालं. कशामुळे झालं. आम्हीही विचार केला. आता लोकसभेत फटका बसल्यावर लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे. काय केल्यावर महायुतीला पाठबळ मिळेल. आम्ही चर्चा केली आणि लाडकी बहीण योजना आली अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
