Jalgaon : देव दर्शनाबरोबरच ‘हे’ देखील महत्वाचेच, एकनाथ खडसेंचा एकनाथ शिंदेंना ‘तो’ सल्ला काय?

| Updated on: Sep 28, 2022 | 8:11 PM

गेल्या काही दिवसांपासून सण उत्सवात देखील राजकीय उद्देश साध्य केला जात असल्याचे चित्र आहे. यावरुनच एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला सुनावले असून दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन दिली आहे.

Jalgaon : देव दर्शनाबरोबरच हे देखील महत्वाचेच, एकनाथ खडसेंचा एकनाथ शिंदेंना तो सल्ला काय?
आ. एकनाथ खडसे
Follow us on

जळगाव : धार्मिक सण देखील आता राजकारणाचे (Politics) केंद्र बनत आहेत. यंदाच्या गणेशोत्सव आणि आता नवरात्रामध्ये ते प्रकर्षाने जाणवत आहे. मुख्यमंत्र्यासह मंत्री आणि इतर सर्व सणोत्सवातही राजकीय स्वार्थ साधत आहेत. त्यामुळे या देवदर्शनाबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांचे (Farmer) प्रश्न देखील मार्गी लावणे गरजेचे असल्याचे आ. एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री (Eknath Shinde) हे देवीच्या आरत्या करीत राज्यभर फिरत आहेत. पण गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हे सरकार दिलासा देऊ शकलेले नाही. त्यामुळे देवदर्शनाबरोबर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथाही समजून घ्याव्यात अशी विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच ई-पीक पाहणी झालेली नाही. ठाणे प्रमाणेच इतर जिल्ह्यांची देखील अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत केवळ घोषणाच होत असून पूर्ततांचे काय असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या अनुषंगाने ई-पीक पाहणी ही गरजेची आहे. मात्र, ही जबाबदारी शेतकऱ्यांवर ढकलून सरकार आणि प्रशासन निर्धास्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अधिक प्रमाणात नुकसान होणार आहे. पण याकडे सरकारला माहित असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सण उत्सव तर महत्वाचे आहेत, पण त्याठिकाणी राजकीय उद्देश साधला जात आहे. मात्र, त्याहूनही महत्वाचे आहे ते राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे. निसर्गाच्या लहरीपणात सरकारने दिलासा देणे गरजेचे होते. राज्यातील शेतकरी मेटाकूटीला आहे. अशातच सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीच मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

आतापर्यंत खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे, पण मदतीबाबत केवळ घोषणा झाली असून शेतकऱ्यांना एक नवा पैसा देखील मिळालेला नाही. नुकसानभरपाई नाही, अनुदान रक्कम नाही एवढेच काय पीक पाहणी देखील नसल्याने शेतकरी वाऱ्यावर असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

राज्यातील बळीराजा यंदा दुहेरी संकटात आहे. उत्पादनात घट तर झालीच पण मोठ्या प्रमाणात खर्च करुनही उत्पादनाची शाश्वती नाही. त्यामुळे सर्वकाही सरकारच्या मदतीवर अवलंबून आहे. आता राज्य सरकारची मदत त्वरीत द्यावी अशी विनंतीच एकनाथ खडसे यांनी केली आहे.