Andheri by-election| अंधेरी पोटनिवडणूक – ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं, पुढील २ दिवस महत्त्वाचे

शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात पुन्हा एकदा राजकीय सामना हा मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत रंगणार आहे, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या लढतीवर असणार आहे.

Andheri by-election| अंधेरी पोटनिवडणूक - ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं, पुढील २ दिवस महत्त्वाचे
| Edited By: | Updated on: Oct 11, 2022 | 10:25 PM

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यास अडचण येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार असणार आहेत. ऋतुजा रमेश लटके या मुंबई महापालिकेत नोकरी करत होत्या, त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. पण तो राजीनामा अजून मंजूर करण्यात आलेला नाही. तो अर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत त्यांना विधानसभेच्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.

हा राजीनामा तातडीनं मंजूर व्हावा म्हणून शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महत्त्वाचे मानले जाणारे नेते, अॅड अनिल परब यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची काल मुंबई महापालिकेत जावून भेट घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाच्या नियमानुसार नोकरीचा राजीनामा किंवा स्वेच्छा निवृत्तीचा राजीनामा ३ महिन्याच्या आत कधीही मंजूर केला जावू शकतो. ठाकरे गटाच्या हाती तीन दिवस आहेत, आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण राजीनामा मंजूर झाल्याशिवाय ऋतुजा लटके या आपला उमेदवारी अर्ज दाखल करु शकत नाहीत.

याआधीच मुंबईतील अंधेरी पोटनिवडणूक ही सध्याच्या राजकीय स्थितीवर अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महापालिकेसाठी ही लिटमस टेस्ट आणि शिंदेगट शिवसेना ठाकरे गटापासून दूर गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे जनमत नेमकं कोणत्या गटाच्या किंवा पक्षाच्या बाजून आहे, हे दिसून येणार आहे.

शिवसेनेचे तत्कालीन आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणार असल्याचं स्पष्ट आहे, तसेच शिवसेना- ठाकरे गटाच्या उमेदवार ह्या ऋतुजा रमेश लटके या असणार असल्याचंही स्पष्ट आहे.

पण या विरोधात शिंदेगट मैदानात उमेदवार उतरवणार की, भाजपा हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-ठाकरेगट एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट आहे, तर दुसरीकडे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना – शिंदेगट ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट आहे.