मनसेचा मविआत समावेश होणार का? लवकरच सर्वात मोठा निर्णय होणार; बड्या नेत्याने सगळं सांगितलं!

लवकरच दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युती होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

मनसेचा मविआत समावेश होणार का? लवकरच सर्वात मोठा निर्णय होणार; बड्या नेत्याने सगळं सांगितलं!
raj thackeray
| Updated on: Aug 04, 2025 | 3:05 PM

Anil Deshmukh : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. याच कारणामुळे राजकीय पक्ष आपापली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे स्थानिक नेतेदेखील आपली राजकीय सोय ओळखून पक्षांतर करत आहेत. राज्यात लवकरच मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय पट बदलणार आहे. हीच बाब लक्षात घेता आता महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुका आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा माहविकास आघाडीतील समावेश यावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्यांच्या विधानानंतर राज ठाकरे यांच्या पक्षाचा महाविकास आघाडीत समावेश केला जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

मुंबई महानगरपालिकेकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जो मुद्दा हाती घेतला आहे, या दोन्ही भावांची मुंबई महापालिकेवर 100 टक्के सत्ता येऊ शकते. महाविकास आघाडीबाबात आमची आणि काँग्रेसची भूमिका काय? याबाबत पुढील काळात चर्चा होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

100 टक्के महाविकास आघाडीचीच सत्ता येणार

तसेच मुंबई महानगरपालिकेवर 100 टक्के महाविकास आघाडीचीच सत्ता राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत आम्ही सर्व नेते एकत्र बसून चर्चा करणार आहोत. महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढेल, अशीच सर्वांची भूमिका वाटतेय, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली.

दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, त्यामुळेच…

पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवरही भाष्य केलं. ही अतिशय आनंदाची बाब आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांत अस्वस्थता आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्याने त्याचा परिणाम मुंबई महापालिकेची निवडणूक तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठी बोलता येत नसेल तर मुजोरी करू नये

अनिल देशमुख यांनी हिंदी-मराठी वादावरही भाष्य केलंय. महाराष्ट्रात हिंदीला विरोध नाही. पण महाराष्ट्रात मराठी बोलता आलं पाहिजे. ज्यांना बोलता येत नसेल त्यांनी मुजोरी करु नये. मै मराठी मे बात नही करूंगा, असे त्यांनी म्हणू नये. मुजोरी केल्यामुळेच मारहाण झाल्याच्या घटना घडल्या, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

राज ठाकरेंचा मविआत समावेश होणार का?

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकत्र आलेले आहेत. या तिन्ही घटक पक्षांना राज्यात कोणाशीही पोटआघाडी करायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असे विधान केले होते. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनीही राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या समावेशावर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घ्यायचं का? याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. याबाबत काँग्रेसचा काय विचार आहे, तेही पाहिले जाईल. सर्व नेते एकत्र बसून महानगरपालिकेबाबत निर्णय घेतील, असं सूचक विधान त्यांनी केलंय. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी महायुतीला नमवण्यासाठी महाविकास आघाडी कोणता डाव टाकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.