दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात लवकरच केव्हाही निवडणूक लागू शकते : आशिष शेलार

| Updated on: Oct 01, 2021 | 2:32 PM

महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे संकेत आपल्याला मिळतात. या सर्वांचा अभ्यास केला तर राज्यात कधीही निवडणूक लागेल, असं भाकितच आशिष शेलार यांनी केलंय.

दोन पक्षांचे आपल्याला संकेत, राज्यात लवकरच केव्हाही निवडणूक लागू शकते : आशिष शेलार
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us on

मावळ : भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळमधून महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागलीय. महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे संकेत आपल्याला मिळतात. या सर्वांचा अभ्यास केला तर राज्यात कधीही निवडणूक लागेल, असं भाकितच आशिष शेलार यांनी केलंय. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं हे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असल्याचा घणाघातही शेलार यांनी केलाय. (Ashish Shelar criticizes Mahavikas Aghadi government in Maval)

मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखाचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केलाय. मावळातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हे बाजीप्रभू आहेत. बूथ प्रमुखच भाजपच्या यशाचा मानकरी आहे. देशातील भाजपचे जे प्रमुख आहेत, ते सर्व एका बूथचे प्रमुख आहेत, असं शेलार म्हणाले. भाजप कार्यकर्त्याला पोलीस, सरकारी अधिकारी त्रास देत आहेत. असं करु नका. ते तुमच्या हिताचं नाही. जो बेकायदेशीर काम करत होता, तो गृहमंत्री असला तरी आता वॉन्टेड आहे. पोलीस अधिकारीही वॉन्टेड आहेत, असा इशाराही शेलार यांनी पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलाय.

‘दलाल राज्य चालवत आहेत’

राज्य सध्या दलाल चालवत आहेत. अनेक खाती दलालांकडून चालवली जात आहेत. गेल्या सात दिवसांपासून आपण पाहतोय की आयकर विभाग काय करतंय. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, असंही शेलारांनी म्हटलंय. 9 ऑगस्टला 3 शेतकरी गोळीबारात मारले गेले होते. अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. ते गुन्हे देवेंद्र फडणवीसांनी मागे घेतले. पण ज्यांनी गोळ्या घातल्या त्या अधिकाऱ्यांना आता चांगली पोस्टिंग दिली गेली आहे. दोन वर्षे झाली तुम्हाला सत्ता मिळून. तुम्ही शेतकऱ्यांसाठी, मावळसाठी काय केलं? असा सवालच शेलार यांनी यावेळी विचारलाय.

‘काँग्रेस झोलबाज, शिवसेना दगाबाज’

हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे. काँग्रेस भुरटी आहे. जे मिळेल ते घेतात, ते झोलबाज आहेत. शिवसेना दगाबाज आहे. मोदी आणि फडणवीसांच्या नावानं मतं मागितली आणि दगाबाजी केली. दगाबाजीने का असेना मुख्यमंत्री झाले. दगाबाजी जरी स्थापन झालं असलं तरी ते विकास करतील असं वाटलं होतं, असा टोला शेलार यांनी यावेळी लगावलाय.

बलात्कार प्रकरणावरुन घणाघात

एमपीएससी करणाऱ्या स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. आई-वडिलांनी कष्ट करुन शिकवलं. पण नियुक्त्या होत नसल्याचं आत्महत्या केली. 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरू म्हणाले. पण त्या भरल्या नाहीत. एमपीएससीत किती जागा मोकळ्या आहेत, हेच यांना माहिती नाही, अशी टीकाही शेलारांनी केलाय. राज्यात महिलांवर रोज अत्याचार होत आहेत. डोंबिवलीत 29 जणांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. साकिनाक्यातील घटना खूप भयावह होती. पोलिसांची भीती उरली नसल्याचं शेलार म्हणाले.

इतर बातम्या :

दुसरा डोस घेतल्यानंतर लोक नियम पाळत नसल्यानं कोरोनाबाधित, अजित पवारांच्या नागरिकांना कानपिचक्या

पंकजा म्हणाल्या, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, धनंजय मुंडे म्हणतात, तुम्ही तर अमेरिकेत गायब होता

Ashish Shelar criticizes Mahavikas Aghadi government in Maval