विधानसभेत गाजणार कन्नड सोयगावचा आखाडा, रावसाहेब दानवेंची कन्या पतीविरोधात रिंगणात?

रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत आहेत.

विधानसभेत गाजणार कन्नड सोयगावचा आखाडा, रावसाहेब दानवेंची कन्या पतीविरोधात रिंगणात?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 24, 2022 | 10:05 AM

औरंगाबादः आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये (Vidhansabha Assembly) औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सोयगाव मतदार संघाचा आखाड्याची जास्त चर्चा आहे. मराठवाड्यातले भाजपचे वजनदार नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कन्या यंदा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. दानवे यांच्या कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) यांची निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावत आहेत. संजना जाधव यांचं पॉलिटिकल ब्रँडिंग सुरु असल्याचं म्हटलं जातंय.. विशेष म्हणजे संजना जाधव त्यांच्या पतीविरोधात या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.

पती हर्षवर्धन जाधवांनाच आव्हान

कन्नड सोयगाव मतदार संघावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव आहे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जाधव यांना शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर आता २०२४ च्या निवडणुकांमध्ये पत्नी संजना जाधव यांच्याकडूनच त्यांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

पॉलिटिकल ब्रँडिंग सुरू

रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत आहेत. लग्न समारंभ, यात्रा जत्रांमध्ये त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. सोशल मीडियातून त्यांचे कार्यक्रमांचे फोटो शेअर केले जात आहेत. त्यामुळे संजना जाधव या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचं स्पष्ट होतंय.

दानवे प्रभाव दाखवणार?

मराठवाड्यात भाजपच्या दोन नेत्यांचा प्रभाव आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. आपापल्या क्षेत्रात दोन्ही नेत्यांची चांगलीच पकड आहे. आता कन्नड सोयगाव मतदार संघातून दानवे यांच्या कन्या राजकीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी हा आखाडा निश्चितच आव्हानात्मक ठरू शकतो.

राजकीय वारसदाराची चर्चा

दरम्यान, मध्यंतरी हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती बरी नसल्याने ते राजकीय वारसदार घोषित करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. वारंवार लक्षवेधी वक्तव्य करून प्रसिद्धी झोतात असलेल्या हर्षवर्धन जाधव यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.