“उद्धव ठाकरेंच्या नशीबात दिव्यांगांची सेवा नव्हती”, बच्चू कडू यांचा घणाघात

| Updated on: Nov 30, 2022 | 10:31 AM

बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

उद्धव ठाकरेंच्या नशीबात दिव्यांगांची सेवा नव्हती, बच्चू कडू यांचा घणाघात
Follow us on

मुंबई : आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे. “दिव्यांगांसाठी काम करणं हे पुण्याचं काम आहे. पण उद्धव ठाकरेंच्या नशीबात दिव्यांगांची सेवा नव्हती”, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणालेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानलेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मी अनेकदा दिव्यांगांसाठीच्या कामाचा प्रस्ताव ठेवला पण त्याला यश आलं नाही. आता शिंदे सरकारच्या काळात या कामांना गती मिळाली आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

गुवाहाटीला गेल्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी राज्याच्या मुख्यसचिवांना फोन केला. त्यांनी सांगितलं की 29 तारखेच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये दिव्यांगांच्या मंत्रालयाचा मुद्दा चर्चिला जावा. तसंच झालं. मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करणं हा माझ्यावर एकनाथ शिंदे आणि सरकारचे उपकार आहेत. त्यांनी हा निर्णय घेऊन दिव्यांगांना न्याय दिला. मी त्यांचा कायम ऋणी राहिल, असं बच्चू कडू म्हणालेत.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करण्यात आली आहे. 3 डिसेंबरपासून या खात्याच्या कारभाराला सुरुवात होईल. यासाठी बच्चू कडू यांनी सरकारचे आभार मानलेत. “भारतातील पहिला दिव्यांग विभाग महाराष्ट्रात, आमच्या २० वर्षाच्या लढ्याला यश… हा दिवस आमच्यासाठी गौरवाचा, वैभवाचा व दिव्यांग बांधवाना गतिमान करण्याचा आहे. आम्हाला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार…”, असं ट्विट बच्चू कडू यांनी केलं आहे.

दिव्यांगांसाठी काम करणं हे पुण्याचं काम आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या कामात आता दिरंगाई होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.