मोदींच्या उदात्तीकरणासाठी शिवरायांचा उपयोग खपवून घेणार नाही : बाळासाहेब थोरात

| Updated on: Jan 13, 2020 | 5:11 PM

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप कार्यालयात प्रकाशित झालेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या प्रकाशनाचा निषेध केला आहे (Controversial Book on Chhatrapati Shivaji Maharaj).

मोदींच्या उदात्तीकरणासाठी शिवरायांचा उपयोग खपवून घेणार नाही : बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप कार्यालयात प्रकाशित झालेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा निषेध केला आहे (Controversial Book on Chhatrapati Shivaji Maharaj). भाजपच्या खर्चानं हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. नरेंद्र मोदींचं उदात्तीकरण करण्यासाठी हा प्रयत्न होत आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं (Controversial Book on Chhatrapati Shivaji Maharaj).

बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेस राज्यभरात रस्त्यावर येऊन या पुस्तकाला विरोध करेल. लोकही स्वतः उत्स्फुर्तपणे बाहेर येत आहेत. सकाळपासून जनता आपला संताप व्यक्त करत आहे. आम्हीही रस्त्यावर येऊ, जनता आमच्यासोबत असेल. या पुस्तकाचं प्रकाशन भाजपच्या कार्यालयात झालं. भाजप या पुस्तकाचं कौतुक करत आहे. विशेष म्हणजे पुस्तकाचे लेखक भाजपने परवानगी दिली तरच पुस्तक मागे घेईल, असं म्हणतात. याचा अर्थ भाजपच्या खर्चानं असं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.”

नरेंद्र मोदींच्या उदात्तीकरणासाठीच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यासाठीच हा प्रयत्न सुरु आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही, असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

“देश अडचणीत नेणाऱ्याची तुलना शिवरायांशी होऊच कशी शकते?”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्यासोबतच सुराज्यही होतं. इथं मात्र उलटं करण्यात आलं. देश चांगला सुरु होता, त्याला कठीण परिस्थितीत नेण्याचं काम करण्यात आलं. ते करणाऱ्यांची तुलना शिवाजी महाराजांशी होऊच कशी शकते? म्हणून या पुस्तकाचा आम्ही निषेध करतो. भाजपनं ते पुस्तक तर मागं घ्यावंच, पण संपूर्ण देशातील जनतेची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.”