म्हणून माझ्या डोक्यात हवा गेली नाही… भास्कर जाधव यांचा संजय राऊत यांना घरचा आहेर

मला मंत्रिपद मिळायला हवं होतं. मला मिळालं नाही. मी उद्याही तेच बोलणार, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.

म्हणून माझ्या डोक्यात हवा गेली नाही... भास्कर जाधव यांचा संजय राऊत यांना घरचा आहेर
sanjay raut and bhaskar jadhav
| Updated on: Jun 22, 2025 | 3:52 PM

Bhaskar Jadhav : ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांची साथ सोडली हे मला कधीतरी चुकीचं वाटतं, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधवांनी त्यांची खंत मांडली आहे, आता पक्षप्रमुख त्याची दखल घेतील. आम्ही त्यांना भाषण करायची संधी देतो, असं त्यांनी म्हटलंय. आता राऊतांच्या याच विधानाचा समाचार भास्कर जाधव यांनी घेतलाय.

मी तेव्हा बोललो, मी आजही बोलेन

शरद पवार यांची साथ सोडली, त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, असं अजिबात नाही. तसं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. मी शरद पवार यांना सोडल्याचा निर्णय चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो. पण मला त्याची खंत वाटतंय असं अजिबात नाही. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवं. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून काय रडत बसायचा का? उलटं लढायचं. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी जे फुटून गेले त्यांच्याबरोबरही मी गेलो नाही. मी लढत आहे, अशी खदखद भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही

तसेच, संजय राऊत हे माझे वरिष्ठ नेते आहेत. माझ्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहतात. आपल्या नेत्याने एखादे विधान केले असेल तर आपण त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीने ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. पण मला वाटतं की मला भान आहे. पक्ष मला भाषण करायला देतो की नाही हे मला चांगलं कळतं. माझं भाषण झाल्यानंतर संजय राऊत यांचं भाषण झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून हे बोलतोय, असा त्यांच्या बोलण्यातून जो संदेश जातोय हे चुकीचं आहे, असं स्पष्टीकरण भास्कर जाधवांनी दिलं.

…तरीही पक्ष मला भाषण करण्याची संधी देतो

तसेच, बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळात असणारे नेते सुभाष देसाई हे व्यासपीठावर असतात. दिवाकर रावते हेही व्यासपीठावर असतात. तरीही पक्ष मला भाषण करण्याची संधी देतो. त्याच्याही उपर आदित्य ठाकरे व्यासपीठावर असतात तरीही मला भाषणाची संधी दिली जाते. माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. मला भाषण करायला मिळालंच पाहिजे. मी भाषण करणारा मोठ माणूस आहे, हे माझ्या डोक्यात नाही एवढंच मला सांगायचं आहे, असा घरचा आहेर, भास्कर जाधवांनी दिला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

भास्कर जाधव काय बोलले. हे त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही. पण अशा प्रकारे त्यांना मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर बोलायला काहीच हरकत नाही. ते आमचे जवळचे सहकारी आहेत. मित्र आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी व्यासपीठावर भास्कर जाधव यांनी भाषण केलं. त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्याने पक्षात त्यांची भूमिका मांडत असतात. यापुढेही ते त्यांच्या भूमिका मांडत राहतील. भास्कर जाधव यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षप्रमुख त्यांची दखल घेतील, असे संजय राऊत म्हणाले होते.