उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला फोडला, ठाण्यातील महत्त्वाच्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

Shivsena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. ठाण्यातील एका महत्त्वाच्या नेत्याने ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला फोडला, ठाण्यातील महत्त्वाच्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
Shivsena Shinde vs Thackeray
Image Credit source: TV 9 Marathi
Updated on: Dec 02, 2025 | 5:50 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरु आहे. 262 नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यानंतर आता काहीच दिवसांत महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे अशा राज्यातील महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकीवर राज्यातील जनतेचे लक्ष असणार आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रामचंद्र पिंगुळकर यांचा ठाकरे गटात प्रवेश

ठाण्यातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राजन विचारे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

आगामी काळात ठाणे महानगर पालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. आता या बालेकिल्ल्यातील उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाण्यात थोडी कमकुवत झाली असून ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. आता आगामी काळात इतरही नेते पक्षांतर करण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, दगाबाज भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या सत्तेसाठी सगळी लाचारी चालली आहे. हवेत प्रदूषण आहे तसे राजकारणात आहे. काँग्रेस बरोबर गेले. उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धुळफेक करण्याचे काम केले, अजित पवार निधी देत नाही, अशी अनेक कारणे ठाण्याची लोक देतात. मला शिव्या घालत होते. आज त्यांचेच फोटो सोनिया गांधींसोबत आहेत.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आजही ठाण्यात शिवसेनेचा वट आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचं आहे. भगव्यावर कोणतही चित्र छापू नका, तो शिवरायांचा आहे, तो पवित्र आहे, तो तसाच फडकला पाहिजे. मशाल घेऊन पुढे चला, मशालीच्या तेजाने सर्व जळमट जळून खाक होईल. इतरांनी जे केले ते तुम्ही करू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.