स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांवर कारवाई करा, अन्यथा कोर्टात जाणार, भाजपचा इशारा

| Updated on: Feb 19, 2021 | 4:33 PM

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमविर सिंग यांची भेट घेऊन, यशवंत जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांवर कारवाई करा, अन्यथा कोर्टात जाणार, भाजपचा इशारा
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेतील भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्हाट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा गंभीर आरोप भाजपने केलाय. याबाबत नगरसेवक मिश्रा यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. त्याला चार दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमविर सिंग यांची भेट घेऊन, यशवंत जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाहीतर न्यायालयात जाण्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिलाय.(BJP demands action against standing committee chairman Yashwant Jadhav)

मेसेजचे स्क्रिनशॉट्स पत्रकारांना दाखवले

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सत्ताधार्‍यांकडून विकासनिधीत भेदभाव केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केलाय. जाधव यांच्या प्रभाग क्रमांक २०९ मध्ये जास्त निधी घेवून अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत केला होता. निधी वाटपाबाबत प्रश्न उपस्थित केल्याने स्थायी समिती अध्यक्ष जाधव यांनी नगरसेवक मिश्रा यांना व्हॉट्सअॅपवर अर्वाच्य भाषेत धमकावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मिश्रा यांनी केलाय. मोबाईलवर जाधव यांनी पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉटही पत्रकार परिषदेत मिश्रा यांनी दाखवले. याबाबत पोलिसांत लेखी तक्रार देऊनही जाधव यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा आरोप भाजपने केलाय.

भाजप सडेतोड प्रत्युत्तर देईल- लोढा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सत्ताधार्‍यांकडून सर्वसामान्यांच्या पैशांची लूट सुरू आहे. याला भारतीय जनता पक्षाचा तीव्र विरोध आहे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नीतीला विरोध केल्याने थेट मोबाईलवरून धमकावण्याचा प्रकार स्थायी समिती अध्यक्षांनी केल्याचा आरोप भाजपनं केलाय. असं वर्तन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचं भाजपनं म्हटलंय. ही बाब अतिशय गंभीर असून मुंबई पोलिसांनी त्यात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली आहे. महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पहारेकऱ्यांची भूमिका यशस्वीपणे पार पाडली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. याला भाजप सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दिलाय.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह

390 कोटींचा निधी अखेर मिळाला; नगरसेवकांचं आता ‘मिशन ऑक्टोबर’

BJP demands action against standing committee chairman Yashwant Jadhav