आगामी मुंबई महापालिकेत 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, रामदास आठवलेंचे आदेश

आतापासून कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी, असे आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत. (Ramdas Athawale on Mumbai election)

आगामी मुंबई महापालिकेत 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, रामदास आठवलेंचे आदेश
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री

मुंबई : मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एक ही उमेदवार निवडून आला नाही. या लाजिरवाण्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी येत्या 2022 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाईचे किमान 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. (Get ready for Mumbai election said Ramdas Athawale)

एम आय जी क्लब येथे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी रिपाईच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रामदास आठवले यांनी मुंबई मनपा निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि रणनीती ठरविण्याबाबत चर्चा केली.

आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना; राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र आव्हान उभे करेल. त्यांच्या विरुद्ध भाजप आणि आरपीआय युती करून लढेल. भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर करण्यासाठी भाजपसोबत आरपीआयचे उमेदवार निवडून आणणे आवश्यक आहे. यासाठी आपापले वॉर्ड निश्चित करुन आतापासून कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी, असे आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत.

उमेदवारी कोणाला?

  • एकनिष्ठता आणि ज्येष्ठता यांचा पक्षात सन्मान होईल.
  • मात्र प्रत्येक ठिकाणी उमेदवारी देताना केवळ जिंकून येण्याची गुणवत्ता लक्षात घेऊन उमेदवारी दिली जाईल.
  • जुन्या ज्येष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांबरोबरच नव्या कार्यकर्त्याना संधी मिळेल.
  • विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना ही रिपाईची उमेदवारी दिली जाईल.
  • त्यात बौद्ध मातंग, मुस्लिम, मराठा, हिंदी भाषिक, गुजराती, तामिळ, कन्नड अशा सर्व भाषिक रिपाईतर्फे उमेदवारी दिली जाईल

आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याच्या पूर्वतयारीसाठी तालुकानिहाय मेळावे आयोजित करावेत. त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे आयोजित करावेत. तालुका आणि जिल्हा निरीक्षक नियुक्त करावेत, असे निर्देश रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिले.

मुंबई मनपा निवडणुकीत अनुसूचित जाती आणि जमाती साठी योग्य प्रमाणात आरक्षण ठेवण्यात आलेले नाही. अनुसूचित जाती जमाती च्या प्रमाणात आरक्षण ठेवल्यास राखीव मतदारसंघाची संख्या वाढू शकते. त्यासाठी न्यायालयात जाण्याचा आपला विचार आहे, असे रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी संगितले.

या बैठकीत मुंबईत संघटनात्मक बांधणी करताना मतदार यादीनुसार बूथ प्रमुख निवडण्याची सूचना रिपाई मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली. तर भाजपच्या कमळ चिन्हावर रिपाई कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची सूचना ज्येष्ठ नेते चंद्रकांत कसबे यांनी केली. (Get ready for Mumbai election said Ramdas Athawale)

संबंधित बातम्या : 

‘उद्धव ठाकरे आपडा’, गुजराती मतांसाठी शिवसेनेचा मेळावा

सर्वसामान्यांकडून नियमित करवसुली, मात्र श्रीमंतांवर मुंबई महापालिका मेहेरबान!

Published On - 6:17 pm, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI