‘उद्धव ठाकरे आपडा’, गुजराती मतांसाठी शिवसेनेचा मेळावा

शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

'उद्धव ठाकरे आपडा', गुजराती मतांसाठी शिवसेनेचा मेळावा

मुंबई: ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. अंधेरी-ओशिवरा इथल्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ११ गुजराती उद्योगपती शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत.(Shiv Sena rally for Gujarati voters)

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना साद घालायचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून आता शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

शेलार, भातखळकरांची खरपूस टीका

दिवसेंदिवस शिवसेनेचा पायाखालचा मतदारवर्ग घसरत चालल्याने कृत्रिम वलय तयार केलं जात आहे. शिवसेनेने आत्मविश्वास गमावला, म्हणून त्यांना खमंग ढोकळा आठवला, अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.  तर जिलबी अने फाफडा, जनाब सेनेला द्या झापडा, अशी भूमिका गुजराती मुंबईकरांनी आता घेतली आहे, अशी खरमरीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

काँग्रसकडून शिवसेनेच्या भूमिकेचं स्वागत

“शिवसेनेच्या भूमिकेवर मी काय सांगू शकतो. महाविकास आघाडी मजबूत व्हावी असं मला वाटतं. कालांतराने भूमिका बदलतात. अनुभवाने माणूस शिकतो. शिवसेनाचा हा बदल स्वागतार्ह आहे”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरेंचे ‘केम छो वरळी’

वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे बॅनर्सही चर्चेचा विषय ठरला होता. आदित्य यांची वरळीतून उमेदवारी घोषित झाल्यानंतर अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ‘केम छो वरळी’ असे गुजरातीतून पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्सवरून विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. यानंतर शिवसेनेला हे पोस्टर्स हटवावे लागले होते.

संबंधित बातम्या:

माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

Shiv Sena rally for Gujarati voters

Published On - 10:07 am, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI