माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या भूमिकेवर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे (Ashok Chavan on Shiv Sena Gujrati Melava)

माणूस अनुभवाने शिकतो, शिवसेनेच्या जिलेबी फापडा, उद्धव ठाकरे आपडावर काँग्रेसची प्रतिक्रिया
काँग्रेस नेते अशोक चव्हाण

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती भाषिक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना शिवसेनेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली (Ashok Chavan on Shiv Sena Gujrati Melava).

“शिवसेनेच्या भूमिकेवर मी काय सांगू शकतो. महाविकास आघाडी मजबूत व्हावी असं मला वाटतं. कालांतराने भूमिका बदलतात. अनुभवाने माणूस शिकतो. शिवसेनाचा हा बदल स्वागतार्ह आहे”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली (Ashok Chavan on Shiv Sena Gujrati Melava).

अशोक चव्हाण यांनी यावेळी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरुन राजकारण तापलं आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “औरंगाबाद नामकरण हा विषय माध्यमांनी उचललेला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही बोलले आहेत का? सरकारमधून कुणी काही निर्णय घेतले का? माध्यमांनी अजेंडा सेट करायचा त्यावर प्रतिक्रिया घ्यायच्या, अजूनही हा विषय नाही. आम्हाला राज्यातील विकास कामांबाबत जास्त रस आहे. जिल्हास्तरावर कुणी काही बोलत असतील तर तो विषय जिल्हास्तरावरचा आहे. राज्य स्तरावर हा विषय नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज्याला स्वायत्तता आहे की नाही? : चव्हाण

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने दिलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. “राज्याच्या सगळ्या गोष्टी ईडी, सीबीआयकडे जात असतील तर राज्याला स्वायत्तता आहे की नाही? राज्यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप किती असावा? राजकीय हेतूने या गोष्टी घडत आहेत. राज्याचे विषय रोज सीबीआय आणि ईडी होणार असेल तर हे योग्य नाही. भाजप सोडून सगळ्यांच्याच पक्षांना नोटीस येत आहेत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार?

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतही अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अजूनही अधिकृतरित्या काहीही सांगितलेलं नाही. प्रभारी एच. के. पाटील आज मुंबईत येत आहेत. ते आल्यानंतर अजेंडा काय आहे ते समजेल. अद्याप याबाबत कुठलीही सूचना नाही. आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुका आहेत त्याबाबत पूर्वतयारीसाठी बैठक असावी, असा माझा अंदाज आहे. बदलाच्या बाबतीत संकेत नाहीत”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

“एका विशिष्ट परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांताकडे जबाबदाऱ्या देण्यात आल्या. हळूहळू आपोआप जबाबदार्‍या वाढत गेल्या. त्यांच्याकडे तीन पदं दिली गेली असं नाही, त्या जबाबदाऱ्या आपोआप येत गेल्या. त्यांनीही बोलून दाखवलंय जबाबदार्‍या जास्त आहेत. पण तशी चर्चा नाही झाली. बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. ते पदांना चांगला न्याय देत आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI