फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात, OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार

| Updated on: Jun 26, 2021 | 1:48 PM

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात, OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार
भाजप नेते पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली. (BJP leader And karyakarta All Over maharashtra Agitation Over OBC political reservation)

नागपुरात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा आरोप त्यांनी केला. सरकारला येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्यात, असा आरोपही त्यांनी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात एल्गार

संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शेलार, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन यांचं मुंबईत आंदोलन

भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ओबीसी आरक्षण हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रद्द झालेलं आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेलार आणि महाजन यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. सरकार ओबीसी आरक्षणविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

पंकजा मुंडे यांचा पुण्यात सरकारवर आसूड

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर केली. तसंच आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार देखील केला. त्या पुण्यात बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका… संघर्षाची भावना तुटू देऊ नका… ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत.”

(BJP leader And karyakarta All Over maharashtra Agitation Over OBC political reservation)

हे ही वाचा :

आता सत्तेवर आलात, भविष्यात जनता दारात उभं करणार नाही, OBC आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

तुमच्या छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं? , देवेंद्र फडणवीसांचा सवाल

OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो!’