आधी राणेंच्या बेहिशेबी मालमत्तेची तक्रार, आता राणेंकडेच सोमय्यांकडून सेनेच्या बड्या नेत्यांवर कारवाईची मागणी

| Updated on: Jul 14, 2021 | 11:54 AM

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. नारायण राणेंच्या भेटीसाठी सोमय्या दिल्लीत दाखल झाले.

आधी राणेंच्या बेहिशेबी मालमत्तेची तक्रार, आता राणेंकडेच सोमय्यांकडून सेनेच्या बड्या नेत्यांवर कारवाईची मागणी
Kirit Somaiya meet Narayan Rane
Follow us on

नवी दिल्ली : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांची भेट घेतली. नारायण राणेंच्या भेटीसाठी सोमय्या दिल्लीत दाखल झाले. या भेटीत त्यांनी कोकणातील मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट्स, बंगले बेकायदेशीर बांधकाम आणि त्यावर कारवाई संबंधी चर्चा केली. स्वत: सोमय्यांनी याबाबतचं ट्विट करुन ही माहिती दिली.

किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित करुन, कारवाईची मागणी केली आहे. असं असलं तरी एकेकाळी किरीट सोमय्यांनी खुद्द नारायण राणे यांच्या  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2016 मध्ये केली होती.

सोमय्यांचे मिलिंद नार्वेकरांवर आरोप

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधला, असा आरोप भाजपचे दिग्गज नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जात नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार नार्वेकरांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.

सोमय्यांचे अनिल परब यांच्यावर आरोप 

किरीट सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्चून अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी त्याबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली. या तक्ररीची दखल घेत केंद्रीय पथकाने काही दिवसापूर्वी या रिसॉर्टची पाहणी केली.

सोमय्या यांनी काही दिवसापूर्वी तत्कालिन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबद्दल तक्रार केली होती. हा रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी याबाबतची तक्रार फक्त जावडेकरच नाही तर ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही केली आहे.

सोमय्यांचे नारायण राणेंवर आरोप

किरीट सोमय्यांनी 2016 मध्ये नारायण राणे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. राणेंचं निलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटींचा व्यवहार असून, यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती.

राणेंनी काही कंपन्या काढून कमी रुपयांचे शेअर्स दाखवले आणि तेच शेअर्स मग अधिक किंमतीला विकून मोठा गैरव्यवहार केला असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

संबंधित बातम्या  

दापोलीच्या समुद्र किनारी परवानगी न घेता मिलिंद नार्वेकरांचा बंगला, किरीट सोमय्यांचा आरोप

अनिल परबांच्या अडचणी वाढणार? सोमय्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पथकाकडून परबांच्या रिसॉर्टची पाहणी

‘ही कमाल फक्त उद्धव ठाकरेच करु शकतात!’ जमीन खरेदी प्रकरणात सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना टोला