Pravin Darekar: ‘बंटी पाटलांमुळेच निर्णय लांबला’ ‘संघर्ष मोर्चा’वरुन भाजपचा पलटवार, दरेकरांनी सगळं सांगितलं!
तुमची संस्थाने उद्ध्वस्त होत आहेत खालसा होत आहेत म्हणून तुम्ही टिका करत आहात," अशा शब्दात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली.

Kolhapur Sangharsh Morcha: गोकुळच्या निवडणुकीनंतर चार संचालक नेमण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापूरमध्ये आज संघर्ष मोर्टा निघाला. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या विराट मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते उपस्थित होते. या विराट मोर्चामधून विरोधकांनी राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या मोर्चानंतर आता भारतीय जनता पक्षाने पहिली प्रतिक्रिया दिली असून सतेज पाटील यांनी राजकारणासाठी हा डाव टाकल्याचा मोठा आरोप आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे.
काय म्हणाले प्रविण दरेकर?
“काँग्रेसच्या सरकारमध्ये कारखारदारी उद्ध्वस्त झाली असती. देवाभाऊंच्या पुढाकाराने तो टॅक्स माफ केला अन् कारखाने पुन्हा उभे केले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तो टॅक्स माफ केला. बंटी पाटलांना जाणीव पाहिजे आपल्या एवढ्या वर्षाच्या सत्तेच्या काळात सहकाराचे खाते नव्हते. मोदी साहेबांनी स्वतंत्र खाते निर्माण केले. तुम्ही ओरबाडण्यासाठी सहकार वापरला. तुमची संस्थाने उद्ध्वस्त होत आहेत खालसा होत आहेत म्हणून तुम्ही टिका करत आहात,” अशा शब्दात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली.
तसेच “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संयमी भूमिका घेतली आहे. एवढे राजकारण झाल्यानंतरही मुख्यमंत्री म्हणाले स्थानिक नेत्यांशी चर्चा करा. परंतु त्यांना निर्णय नको होता त्यांना हा निर्णय प्रलंबित ठेवून आपली राजकीय दुकानदारी सुरु ठेवण्याचा डाव होता. सरकारने डेडलॉग करण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र निर्णय प्रलंबित राहावा म्हणून सतेज पाटील यांनी डाव केला,” असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
सतेज पाटील यांच्यावर निशाणा!
“सरकार आपल्या बाजूने भूमिका मांडण्यासाठी वकिल नेमत असते. तुम्ही गोकुळसाठी देशपातळीवर राजकारण का करत आहात? राहुल गांधी ट्वीट का करत आहेत? म्हणजे आपला तो बाब्या? त्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक लढवली आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालकांना कारभार करता यावा, पुन्हा निवडणूक लागू नये या उदात्त हेतूने सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. सभासदांना पुन्हा निवडणुकीचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला होता. मात्र ह्यांना राजकारणच करायचे होते,” असं म्हणत प्रविण दरेकर यांनी संघर्ष मोर्चावरुन सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.
