संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर

| Updated on: Sep 26, 2020 | 7:22 PM

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आज झालेल्या गुप्त भेटीवर तर्कवितर्क व्यक्त केलं जात असतानाच भाजप नेते आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलं आहे.

संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आज झालेल्या गुप्त भेटीवर तर्कवितर्क व्यक्त केलं जात असतानाच भाजप नेते आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलं आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही. शिवसेना ज्या अर्थी काँग्रेससोबत युती करू शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते. या भेटीचा आनंदच आहे, असं सूचक विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. (Sanjay Raut Devendra Fadnavis meeting)

महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीची काहीही माहिती नाही. राऊतांच्या एका भेटीनं लगेच राजकीय भूकंप होणार नाही. त्यांनी अनेकदा अशा अनेक भेटी घेतल्या आहेत. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणंही दिली आहेत. मात्र, शिवसेना जर काँग्रेससोबत जाऊ शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते हा संकेत शिवसेनेनेच दिला आहे. त्यामुळे राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, असं दरेकर म्हणाले. राऊत सातत्याने फडणवीसांवर टीका करत होते. त्यामुळे कटुताही आली होती. ही कटुता कमी करण्यासाठी फडणवीसांसोबत त्यांना सल्लामसलत करावी वाटली असेल तर त्याचं स्वागतच आहे, असंही ते म्हणाले.

भाजप नेहमी मूल्य आणि तत्त्वांना महत्त्व देणारा पक्ष आहे. त्यामुळे जनतेला जी भूमिका भावते तिच भूमिका भाजप घेत असतो, असंही ते म्हणाले. राऊत-फडणवीस भेटीवर मला भाष्य करता येणार नाही. कारण राऊत उद्या भेट झाल्याचा इन्कारही करतील. आम्ही आज फडणवीसांसोबत ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’त एकत्र होतो. त्याआधी ही भेट झाली असेल तर त्याची माहिती नाही, असंही ते म्हणाले. (Sanjay Raut Devendra Fadnavis meeting)

राजकीय संदर्भ नाही

राऊतांनी ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊतांकडून इन्कार

संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र, ‘टीव्ही9 मराठी’च्या रिपोर्टरने जेव्हा त्यांना तपशीलवार माहिती दिली. तेव्हा मात्र, राऊत यांनी आपण हॉटेलमध्ये होतो. पण फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असते. त्याची मला माहिती नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

फडणवीसांची पुढच्या आठवड्यात ‘सामना’त मुलाखत

दरम्यान, राऊत यांनी फडणवीसांशी भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला असला तरी पुढच्या आठवड्यात दैनिक ‘सामना’मध्ये फडणवीस यांची मुलाखत छापून येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

डिनर डिप्लोमसीत नेमकं झालं काय?

आज दुपारी दीड वाजता राऊत आणि फडणवीस ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेटले. दोघेही साडेतीन वाजेपर्यंत या हॉटेलात होते. दोघांनीही बंद दाराआड चर्चा करतानाच एकत्र दुपारचे जेवण घेतल्याचंही सूत्रांनी सांगितलं. बंद दाराआड झालेल्या या गुप्त भेटीत नेमकं काय झालं? याचा तपशील मात्र कळू शकलेला नाही.

 


संबंधित बातम्या: 

EXCLUSIVE : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ?

स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही : प्रवीण दरेकर

(Sanjay Raut Devendra Fadnavis meeting)