उमेदवारी मागितली भाजपची, तिकीट मिळालं राष्ट्रवादीचं

उत्तम जानकर (Uttam Jankar NCP) भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण त्यांना भाजपऐवजी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. भाजपकडून उत्तम जानकर यांनाच तिकीट दिलं जाईल असा शब्द देण्यात आला होता.

उमेदवारी मागितली भाजपची, तिकीट मिळालं राष्ट्रवादीचं

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत माढा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनराव शिंदे, तर माळशिरसमधून भाजप नेते उत्तम जानकर (Uttam Jankar NCP) यांना उमेदवारी दिली आहे. उत्तम जानकर (Uttam Jankar NCP) भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण त्यांना भाजपऐवजी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. भाजपकडून उत्तम जानकर यांनाच तिकीट दिलं जाईल असा शब्द देण्यात आला होता. पण ही जागा रिपाइला सुटली आहे.

जानकर यांना माळशिरसमधून भाजपाकडून उमेदवारी देण्याचा शब्द लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. मात्र शब्द न पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यातच ही जागा रिपाइला गेल्याने नाराज झालेले उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीत जाणं पसंत केलं. त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन माळशिरसमधूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंब यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. 2009 ला उत्तम जानकर यांनी मोहिते पाटालांच्या गटाचे आमदार हणमंत डोळस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी जानकर केवळ साडेचार हजार मतांनी पराभूत झाले होते.

जात प्रमाणपत्राचा वाद मिटला, पण भाजपचं तिकीट नाहीच

माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. जानकर यांच्याकडे हिंदू खटीक हा जातीचा दाखला आहे. याच दाखल्याच्या आधारावर जानकरांनी मागील निवडणूक लढवली होती. पण जात पडताळणी समितीने त्यांचा हिंदू खाटीक जातीचा दाखला रद्द केला होता.

उत्तम जानकरांना या निर्णायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जातीचा दाखला वैध ठरवल्याने विधानसभा लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *