गणेश नाईकांचं समर्थक नगरसेवकांना स्नेहभोजन, नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का?

| Updated on: Jun 17, 2022 | 9:20 PM

महाविकास आघाडीचा घटकपक्ष होऊन पालिका निवडणूक लढवण्याची मागणी नाईक सर्मथकांनी उचलून धरली आहे.

गणेश नाईकांचं समर्थक नगरसेवकांना स्नेहभोजन, नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का?
Follow us on

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री गणेश नाईक यांनी समर्थक नगरसेवकांना स्नेहभोजनाचं आवताण (Ganesh Naik meeting Supporter Corporators) दिलं आहे. यावेळी नाईक पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. गणेश नाईक घरवापसी करणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार येईल, या आशेने विधानसभा निवडणुकांच्या महिनाभर आधी गणेश नाईक यांनी पुत्र संदीप नाईक यांच्यासह भाजपचा झेंडा हाती धरला होता. शिवसेना-भाजप महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याचीही त्यांना अपेक्षा होती. मात्र फासे पालटले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर भाजपचे काही ‘आयाराम’ आमदार स्वगृही परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत आलेले त्यांचे पुत्र आणि तत्कालीन आमदार संदीप नाईक यांना भाजपने ऐरोली मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. परंतु ऐनवेळी तिकीट बदलून गणेश नाईकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीच्या गणेश शिंदेंना पराभूत करुन गणेश नाईक निवडून आले. मात्र भाजपला आता विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. त्यातच, चार महिन्यांनंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील विळा-भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. नाईकांच्या दृष्टीने पालिका निवडणूक महत्त्वाची असल्याने त्यांनी हालचाली सुरु केल्याचं बोललं जातं.

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबईतही यशस्वी झाला, तर महापालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता धूसर होईल. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष होऊन पालिका निवडणूक लढवण्याची मागणी नाईक सर्मथकांनी उचलून धरली आहे.

गणेश नाईक यांचं वर्चस्व

गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. नुकताच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली आहे.

गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.

Ganesh Naik meeting Supporter Corporators