कोल्हापूरच्या दोन आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत

कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर यंदा शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार आहेत.

कोल्हापूरच्या दोन आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत
Maharashtra MLA List

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा केली. येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. यामध्ये प्रमुख नावं आहेत, ती म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची. या दोघांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडून कोल्हापूर मंत्रिपद?

मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या वाट्याला येणारी मंत्रिपद शिवसेनेकडून कोल्हापूरला देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि हातकणंगलेचे आमदार सुजीत मिणचेकर यांची नावं चर्चेत आहेत. या दोघांपैकी एकाचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर यंदा शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला भरभरुन दिलेल्या कोल्हापूरला शिवसेना काय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक  

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काल भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला भाजप नेते चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, संघटन मंत्री विजय पुराणिक, राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक तसेच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली.

अमित शाहांसोबत चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI